मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले की, पुढील काही दिवसांत काँग्रेसमधील मोठे नेते, तसेच उबाठा गटाचे काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तसेच आज दुपारी शिरसाट यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, मी कुणाचाही निरोप घेऊन त्यांना भेटायला गेलो नव्हतो. तसेच आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज ठाकरे शिवसेनेत असताना जेव्हा मराठवाड्यात यायचे, तेव्हा त्यांच्याशी भेट होत असे. आमचे जुने संबंध असल्यामुळेच मी त्यांची आज सदिच्छा भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेसाठी लाल गालीचा अंथरला आहे

मनसे नेते राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांच्यापासून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकरही याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत आहेत. मात्र महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का? याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रश्नावर बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, मनसेचा निर्णय वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. पण लवकरच मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यात राज ठाकरे पुढची दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे महायुतीला आणखी एक चाक जोडले जावे, अशी आमची इच्छा आहे.

“राज ठाकरेंकडून लोकसभेसाठी महायुतीकडे ‘हा’ प्रस्ताव”, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य चर्चेत

राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास त्यांचे लाल गालिचा अंथरून आम्ही स्वागत करू, असेही संजय शिरसाट म्हणाले.

श्रीकांत शिंदेंसाठी भाजपाही काम करेल

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पक्की होतीच. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नाही तर एक खासदार म्हणून त्यांनी चांगले काम केलेले आहे. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील. त्यांच्या उमेदवारीला कुणाचाही विरोध नाही. महायुतीचा उमेदवार म्हणून मतदारसंघातील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांच्या पाठी उभे राहतील. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे काम उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस करतील, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

“काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा अन् शिंदे गटाला छुपा पाठिंबा, लवकरच…”; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

नारायण राणेंना शुभेच्छा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेचा अजूनही दावा आहे का? या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, नारायण राणे यांनी मतदारसंघात सभांचा धडाका सुरू केला असला तरी त्या महायुतीच्या सभा आहेत. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण नारायण राणेंना उमेदवारी मिळाली तरी आम्हाला आनंदच होईल. या मतदारसंघावरून आमच्यात तेढ वैगरे नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde faction spokesperson sanjay shirsat talk about raj thackeray joining mahayuti kvg