ठाणे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी कामगार मंत्री साबीर शेख यांचे बुधवारी दुपारी कोनगाव येथे खासगी रूग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, पुतण्या असा परिवार आहे. गेल्या दीड वर्षांपासून आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून होते. आजारपणामुळे राजकारणापासून ते काही वर्ष दूर होते. अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी सलग पंधरा वर्ष नेतृत्व केले होते. गुरूवारी सकाळी त्यांच्यावर कोनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निष्ठावान शिवसैनिक आणि कट्टर शिवभक्त म्हणून त्यांची ओळख होती. सुरूवातीच्या काळात शिवसेनेला ठाणे जिल्’ााच्या शहरी भागासह खेडय़ा पाडय़ात पोहचवण्यात साबीर शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या पायावरच पुढे दिवंगत आनंद दिघे यांनी शिवसेनेचा हा गड राखला होता. जुन्नर जवळील नारायण गाव येथे १५ मार्च १९४५ रोजी त्यांचा जन्म एका खाटिक कुटुंबात झाला होता. बालपणी त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. नोकरीसाठी ते मुंबईत आले. अंबरनाथ मधील ऑर्डनन्स फॅक्टरीत ते कामगार होते. तेथेच कामगारांचे नेतृत्व करून ते कामगार संघटनेच्या माध्यमातून पुढे आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेशी घट्ट नाळ बांधली. अखेपर्यंत ते या ब्रीदाला जागले. शेख यांचे वडिल प्रवचनकार असल्याने ते गुण त्यांच्यात उतरले होते. साबीरभाईंनी हिंदू धर्म, संत वाड:मय, साहित्य, शिवपुराणाचा अभ्यास केला होता. या संस्कारामधून त्यांच्यामधील वक्ता शिवसेनेच्या व्यासपीठावर आला. अल्पावधीत शिवसेनेची एक तोफ म्हणून ते ओळखले जाऊ लागले. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना शिवभक्त ही उपाधी दिली होती. अंबरनाथ मतदारसंघाचे १९९१ ते २००४ काळात आमदार होते. युतीच्या सत्ताकाळात ते कामगार मंत्री होते.