आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील जागा युतीकडे रहाव्यात यासाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. याचा पहिला भाग नुकताच पार पडला तो म्हणजे सुजय विखे-पाटील भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यानंतर त्यांचे वडील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

सुजय भाजपामध्ये गेला आहे आता तुम्ही शिवसेनेत यावं आणि युती मजबूत करावी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे-पाटीलांना शिवसेनेने मंत्रीपद दिलं होतं. त्यानंतर आता त्यांची तिसरी पिढी देखील युतीसोबत जात असल्याने ही चांगली गोष्ट असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावताना राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युतीवेळी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते त्यांनी आता तपासायला हवं. जे आपलं घर सांभाळू शकत नाहीत त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, असे सांगताना उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी भान ठेवायला हवं होतं कारण सांगताना भविष्यात काय वाढून ठेवलंय ते त्यांनी बघायला हवं होतं असं ते म्हणाले. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यामुळं त्यांनी आता शिवसेनेतच यावं, असे राऊत म्हणाले.