लहानपणी खेळताना नाकामध्ये गेलेला शिकारीच्या बंदुकीच्या छर्रेयाचा तुकडा १६ वर्षांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करून तब्बल १३ वर्षांनंतर काढण्यात आला. जुहू येथील कूपर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया शनिवारी यशस्वीरीत्या पार पडली असून तिला घरीदेखील सोडण्यात आले.

उत्तर प्रदेश येथे राहणारी सायमा शेख (१६) ही तीन वर्षांची असताना घरामध्ये खेळत होती. त्या वेळेस तिच्या हाताला शिकारीची बंदूक सापडली. तिच्याच वयाच्या दुसऱ्या भावंडाशी बंदूक घेण्यासाठी भांडण सुरू झाले. यामध्ये सायमाच्या हातातून बंदुकीचा चाप ओढला गेला आणि त्यातील एका छर्रेयाचा  तुकडा तिच्या नाकात गेला. त्या वेळी तिथल्या स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. त्यांनी तो तुकडा बाहेर येईल, असे सांगितले. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनीही याकडे गांभिर्याने पाहिले नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सायमाला नाकाजवळ वेदना होऊ लागल्याने तिची मुंबईत वास्तव्यास असलेली बहीण रहिमुन्नीसा हिने तिला कूपर रुग्णालयात नेले.

सायमाच्या तपासणीदरम्यान तिच्या नाक आणि तोंडाच्या भागामध्ये हाडासारखा भाग जाणवत होता. क्ष-किरण तपासणीमध्ये तो छर्रेयाचा  तुकडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करून तुकडा काढण्याचे डॉक्टरांनी ठरवले. हा तुकडा अनेक वर्षे शरीरामध्ये राहिल्याने नाकातून सरकत तोंडाच्या वरच्या बाजूस आला होता व त्यावर दुसरे हाडही वाढले होते. हे हाड कापून तो तुकडा बाहेर काढण्यात आला, असे कूपर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले. दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया कूपर रुग्णालयात केल्या जातात. तेव्हा गरजू रुग्णांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी केले.