कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे. दोघांनाही त्यांच्या जुन्या पक्षांत नेत्यांच्या मुलांचे प्रस्थ वाढल्याने पक्ष सोडून काँग्रेसवासी व्हावे लागले. योगायोगाने उभयता काँग्रेसवासी होण्याची वेळही साधारणपणे सारखीच. मुख्यमंत्रीपद मिळवायचेच हा दोघांचाही निर्धार. सौम्य स्वभाव सिद्धरामय्या यांच्यासाठी फायदेशीर ठरला, तर आक्रमकपणामुळे राणे यांच्या नशिबी थांबा आणि वाट बघा हे अद्यापही कायम आहे.
शिवसेनेने राणे यांना सर्वोच्च असे मुख्यमंत्रीपद दिले. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षात सिद्दरामय्या यांच्याकडे दोनदा उपमुख्यमंत्रीपद आले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रस्थ वाढले आणि राणे यांचे महत्त्व कमी होत गेले. जनता दल (एस) मध्येही कुमारस्वामी यांना देवेगौडा यांनी आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने देवेगौडा आणि सिद्दरामय्या  यांच्या बेबनाव निर्माण झाला. परिणामी राणे यांच्याप्रमाणेच सिद्दरामय्या  यांनी आपल्या मूळ पक्षाला रामराम ठोकला. राणे यांचा काँग्रेस प्रवेश ऑगस्ट २००५ मध्ये झाला. सिद्दरामय्या हे २००६च्या सुरुवातीला काँग्रेसवासी झाले. म्हणजे दोघांचा काँग्रेस प्रवेशही थोडय़ा अंतराने झाला.
काँग्रेसवासी झाल्यावर राणे यांनी आक्रमक स्वभावाला मुरड घातली नाही. शिवसेना पद्धतीने केलेले राजकारण काँग्रेसमध्ये मान्य होत नाही. राणे  अनेक वादात अडकले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात त्यांनी तोफ डागली. मुख्यमंत्रीपद नाकारल्यावर तर त्यांनी थेट राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नव्हती. मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने काँग्रेसमध्ये आलेल्या राणे यांना रांगेत उभे ठेवून काँग्रेसने अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन मुख्यमंत्री निवडले. पण राणे यांचे नशीब अद्याप काही फळफळले नाही. अर्थात, सिद्दरामय्या  यांच्या निवडीनंतर राणे यांच्या निकटवर्तीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बाहेरच्या पक्षातून आलेल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हा प्रचार चुकीचा असल्याचे ते सांगू लागले आहेत.
 सिद्दरामय्या  यांनी मुख्यमंत्रीपदावर नजर ठेवून राजकारण केले. त्यासाठी त्यांनी काँग्रेस संस्कृती अंगीकारली. थयथयाट किंवा आक्रमकता केली नाही. यामुळेच पक्षात प्रवेश केल्यावर दोनच वर्षांत त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. कर्नाटकमधील भाजप सरकारच्या विरोधात त्यांनी राज्यभर यात्रा काढली. काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले. त्याचा त्यांना फायदा मिळाला.