विवेक सुर्वे

@ @viveksurve03

An amount of three crores was found in Bhandup
मुंबई : भांडुपमध्ये आढळली तीन कोटींची रक्कम
Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
lonavala bus fire marathi news, groom s bus catches fire pune marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

सिग्नलची दुनिया तीन रंगाची. निसर्गातील तीन रंग मानवनिर्मित दळणवळणाला वळण लावत असतात. रस्त्यावरील वाहतुकीचा बेरंग होऊ नये म्हणून अहोरात्र कार्यरत असलेल्या या यंत्रणेमागे आधुनिक तंत्र आहे. लाल, हिरवा अन् पिवळा या तीन रंगाचा खेळ पाहणे म्हणूनच उद्बोधक ठरते.

रोज सुमारे २५ लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात. या बेसुमार वाहतुकीच्या नियंत्रणासाठी एकूण ६०१ सिग्नल कार्यरत आहेत. यापकी वाहतूक विभागाचे २५५ तर ३४६ खासगी कंपनीचे आहेत. या शिवाय २३७ सीसीटीव्ही यंत्रणा मुंबईभर कार्यरत आहे. या सगळ्या यंत्रणेवर देखरेख ठेवते ते वरळी येथील ‘मुख्य वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष’. तिथून अवघ्या शहराच्या सिग्नल व्यवस्थेत सुसूत्रता ठेवली जाते. वरळीच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षातील मोठय़ा पडद्यांवर (स्क्रिन्स) संगणक प्रणालीच्या माध्यमातून एका ‘क्लिक’वर तब्बल ६४ ठिकाणांची वाहतूक व्यवस्था एकाच वेळी पाहता येऊ शकते. एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असेल तर वाहतूक नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीवरून अंमलदारांसाठी भराभर संदेश सुटतात आणि वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न तेजीत सुरू होतात.

सकाळी दक्षिणेकडे आणि संध्याकाळी उत्तरेकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवणे ही वाहतूक नियंत्रण कक्षाची मुख्य जबाबदारी आहे. या कामात त्यांना सीसीटीव्ही मदतगार ठरतात. उदाहरणच द्यायचे झाले तर पश्चिम द्रुतगती मार्गावर संध्याकाळच्या वेळी खेरवाडी आणि अंधेरीच्यादरम्यान वाहतूक कोंडी झाली असेल तर त्यांची थेट माहिती वरळीच्या वाहतूक कक्षाला सीसीटीव्हीव्दारे त्वरित उपलब्ध होत असते. ही माहिती वाहतूक कक्षातून अंधेरी जंक्शनच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहतूक अंमलदाराला दिली जाते. मागच्या बाजूला खूप वाहतूक कोंडी झाली आहे, हे लक्षात आल्यामुळे तो वाहतूक पोलीस अंधेरी जंक्शनच्या कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवतो.

वाहतुकीचे चक्र

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील जटिलता हाजीअली जंक्शनमुळे प्रकर्षांने जाणवते. सकाळी चर्चगेट, नरिमन पॉइंटच्या दिशेने जाणारी वाहतूक हाजीअली जंक्शनकडे येऊन अडकते. तर संध्याकाळी हीच परिस्थिती उत्तरेच्या दिशेला असते. याला उत्तर म्हणून मुंबई वाहतूक पोलीस कक्षाने एक उपाय योजला आहे. तो असा की, सकाळच्या वेळी हाजीअलीकडून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी सिग्नलचा वेळ वाढवायचा. हीच क्लृप्ती संध्याकाळी उत्तरेकडे जाणारी वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी वापरायची. ही सगळी व्यवस्था एका चक्राप्रमाणे (वाहतूक कक्षातील अंमलदार याला सायकल म्हणतात) सुरू असते. हे चक्र १८० ते २४० सेकंदादरम्यान असते. एका जंक्शनला किती मार्ग एकत्र येतात, यावर या चक्राच्या वेळा ठरविल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी हे चक्र सतत सुरू असते.

‘फ्लॅशर’चे तंत्रदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नियमित वापरण्यात येते. ते तंत्र असे की एखाद्या जंक्शनला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतील तर तिथले सिग्नल बंद करून फ्लॅशर यंत्रणा सुरू करण्यात येते. त्यामुळे केवळ पिवळा दिवा उघडझाप होत राहतो. अशावेळी त्या जंक्शनची वाहतुकीची जबाबदारी तिथल्या अंमलदारांच्या खांद्यावर पडते. त्यामुळे नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीच्या मदतीने बिनतारीच्या (वायरलेसच्या) माध्यमातून अंमलदाराला वेळोवेळी संदेश पाठवला जातो. थोडक्यात कुठल्या दिशेने वाहतूक जास्त आहे, याचा अंदाज घेतला जातो. जर दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जास्त असेल तर ती आधी सोडवण्याची सूचना वाहतूक नियंत्रण कक्षातून अंमलदारांना दिली जाते. एकदा का, वाहतूक सुरळीत झाली की सिग्नल यंत्रणेचे चक्र पुन्हा नव्याने फिरू लागते.

वेरिएबल मेसेजिंग सिस्टम

गाडीत रेडिओची सोय असेल तर त्याद्वारे वाहनचालकाला मार्गातील बदल, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक कोंडी या संबंधीची माहिती वेळीच मिळू शकते. गुगल मॅपचीही सुविधा वाहनचालकांना मोलाची ठरत असते. मात्र जिथे या सोयी उपलब्ध नाहीत तिथे ‘वेरिएबल मेसेजिंग सिस्टम’ (इलेक्ट्रॉनिक संदेश फलक) हा एक चांगला पर्याय वाहतूक नियंत्रण कक्षाने मुंबईकरांना दिला आहे. शहरात ४६ ठिकाणी असे इलेक्ट्रॉनिक फलक बसवण्यात आले आहेत. या फलकांवर रस्ते अपघात, रस्ते दुरुस्ती, मार्गातील बदल आणि वाहतूक कोडींच्या सूचना झळकत असतात. एरवी दारू पिऊन वाहन चालवू नये, सिग्नल मोडू नये, लेनची शिस्त पाळावी, बेदरकार वाहन चालवू नये अशा लोकोपयोगी सूचनाही या फलकांवर सतत झळकत असतात. अर्थात या फलकांचा वाहतूक नियंत्रणाकरिता अजूनही म्हणावा तसा वापर केला जात नाही.

सर्वसामान्यपणे मुंबईकर सिग्नलच्या लाल आणि हिरव्या रंगाशीच आपला वास्ता आहे, असे मानतात. परंतु सिग्नल यंत्रणेचा कणा हा पिवळा रंग असतो. लालनंतर एकदम हिरवा रंग सिग्नलवर झळकला तर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हिरवा, लाल आणि मुंबईकर हाताबाहेर जाऊ नये, हे पाहण्याचे काम पिवळा रंगाचा सिग्नल करत असतो.

मुंबईत दररोज सुमारे तीन हजार वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम नेटाने करत असतात. या कामी त्यांना सहाय्यभूत ठरते ते वाहतूक नियंत्रण कक्ष. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे कक्ष सर्वव्यापी परमेश्वराप्रमाणे कार्यरत असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था नियंत्रणाचे काम अधिक प्रभावी झाले आहे. येणाऱ्या काळात शहरात सुमारे पाच हजार सीसीटीव्ही बसवून वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. तरीदेखील सिग्नल हीच वाहतूक व्यवस्थेची मुख्य कळ असणार आहे. थोडक्यात काय तर, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा, हजार बारा होऊ नये, म्हणून सिग्नलचे तीन रंग दिवस-रात्र खपत राहणार आहेत.

व्हीआयपींची वाहतूक

अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी, व्हीआयपी) व्यक्तींची ये-जा ही वाहतूक नियंत्रण कक्षासाठी आणि वाहतूक पोलिसांसाठी सत्व परीक्षाच असते. सिग्नल सुरू ठेवल्यास रस्त्यावरची इतर सर्व शेकडो वाहने पुढे जाऊ पाहतात. प्रसंगी वाहन चालकांची आणि वाहतूक पोलिसाची या मुद्द्यावर बाचाबाचीही होते. म्हणून अशावेळी वाहतूक नियंत्रण कक्ष फ्लॅशरचा पर्याय वापरून अतिमहत्वाच्या व्यक्तींचा वाहन ताफा पुढे काढते. यात वाहतूक अंमलदाराची कसोटी लागते.

सीसीटीव्हीच्या मदतीने रस्त्यावर घडलेल्या अपघाताची माहिती मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला काही सेकंदात कळते. कक्षातर्फे लागलीच स्थानिक पोलीस ठाण्यात फोन जातो. अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, ही वाहतूक पोलिसांची मुख्य जबाबदारी आहे, असे वाहतूक पोलीस यंत्रणा मानते. तशा सूचना कक्षातर्फे पोलीस ठाण्यात दिल्या जातात.

vivek.surve@expressindia.com