नववर्ष स्वागताच्या आयोजनाच्या निमित्ताने अमली पदार्थाना मागणी; अमली पदार्थविरोधी पथकाची  करडी नजर

सरत्या वर्षांला नशेत निरोप देऊन धुंदीतच नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह आसपासच्या शहरांत सध्या छुप्या रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराबाहेरील ठिकाणांसह पब किंवा नाइट क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पाटर्य़ासाठी समाजमाध्यमांवरून सांकेतिक निमंत्रण पाठवण्यात येत असून या निमंत्रणांमध्ये पार्टीतील अमली पदार्थाचीही कल्पना देत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही बाब लक्षात आल्याने पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने समाजमाध्यमे तसेच अशा पार्टीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पार्टी ड्रग म्हणून प्रसिद्ध असलेल्या एलएसडी पेपर किंवा डॉटवरील चित्र त्याचा दर्जा ठरवते. नटराज (डान्सिंग शिवा), बुद्धाची चित्र अनेकदा एलएसडी पेपरवर आढळतात. नटराजाचे चित्र असलेला एलएसडी पेपर महाग विकला जातो. ही चित्रे एलएसडी पेपरच्या व्यवहारात सांकेतिक ठरतात. त्यानुसार रेव्ह पाटर्य़ाच्या आमंत्रणांवर शंकराचे छायाचित्र आढळते. ध्यानस्थ शंकर, ओम असलेली आमंत्रणे, त्यात टीझर, सनबर्न हे शब्द ही रेव्ह पाटर्य़ाचे आयोजक आणि त्यात सहभागी होऊ पाहणाऱ्यांमधील सांकेतिक भाषा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पथकातील अधिकारी, कर्मचारी अमली पदार्थाची खरेदी-विक्री, रेव्ह पाटर्य़ासाठी सातत्याने बदलत्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करीत आहेत. यासाठी पथकाने खबऱ्यांचे जाळे शहरभर फेकून जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याची धडपड चालवली आहे. याशिवाय कोकेन, एलएसडी, आइस, मॅण्ड्रेक्स या पार्टी ड्रग्जची तस्करी करणारे, मोठे वितरक कोण याचीही माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचे समजते. अमली पदार्थाच्या वितरण साखळीवर हल्ला करण्याचा पथकाचा इरादा आहे. परदेशासह देशातील अन्य राज्यांमधून मुंबईच्या दिशेने अमली पदार्थाचा साठा घेऊन येणारे, मोठे वितरक यांना लक्ष्य करण्याची व्यूहरचना पथकाने आखल्याचे समजते. या व्यक्तींवर कारवाई घडल्यास वितरण साखळी उद्ध्वस्त होते, परिणामी अमली पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

सांकेतिक शब्द

  • ‘ParTy’ या शब्दातील ‘टी’ हे आद्याक्षर मोठय़ा लिपीतील असल्यास संबंधित पार्टीत मेथ अथवा एमडी उपलब्ध करून देण्यात येईल, असा सांकेतिक अर्थ आहे.
  • ‘स्नो स्कीइंग’च्या नावाखाली कोकेन सेवनासाठी निमंत्रणे पाठवण्यात येत आहेत.
  • ‘पीएनपी’ या नावाने पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रणांच्या पार्टीमध्ये अमली पदार्थ आणि शरीरसुख उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
  • ‘४२०’ अशा नावाने पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रणांमध्ये ‘मॅजिजुआना’ हा अमली पदार्थ देण्याचे आमिष दाखवले जात आहे.

समाजमाध्यमांवरून सांकेतिक भाषेतील आमंत्रण दिल्यास ते एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचते. त्यात भाग घेण्यासाठीचे शुल्कही चोरी-छुपे भरले जाते. त्यामुळे समाजमाध्यमांवरील हालाचाली टिपल्या जात आहेत.

शिवदीप लांडे, पोलीस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख