|| सुशांत मोरे

२५९ पैकी फक्त ८५ लोकलच्या महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरा

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय साधारण दोन वर्षांपूर्वी घेण्यात आल्यानंतरही पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील २५९ लोकलपैकी अवघ्या ८५ लोकलच्याच डब्यांत कॅमेरा बसवण्यात रेल्वेला यश आले आहे. पश्चिम रेल्वे महिलांबरोबरच पुरुषांच्याही डब्यांत कॅमेरे बसवीत आहे, परंतु मध्य रेल्वेवर महिला डब्यांनाच प्राधान्य दिले जात आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी (आधीचे एल्फिन्स्टन रोड) स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांबरोबरच विविध सुविधांचा आढावा घेतला होता. या वेळी लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वेवर कॅमेरा बसवण्याच्या कामाला रेल टेलकडून सुरुवात करण्यात आली.

अद्याप मात्र हे काम संथगतीनेच सुरू असल्याचे दिसते. करोनाकाळातील गेल्या आठ महिन्यांत लोकल बंद असताना प्रकल्पाला गती मिळाली नाही. पश्चिम रेल्वेवर साधारण १०० लोकल गाड्या आहेत. यातील ४७ लोकलच्या १४४ महिला डब्यांत आणि ६० पुरुषांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवरही एकूण १५९ लोकल गाड्या आहेत. यातील ३८ लोकलच्या फक्त महिला डब्यांतच कॅमेरा बसवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे काम रेल्वे बोर्डाने रेल टेलला दिल्याचे सांगितले. ही कामे पूर्ण करण्याची मुदत रेल टेलकडूनच निश्चित केली आहे. सध्या पुरुषांच्या डब्यात कॅमेरे बसवण्यात आलेले नसल्याचेही ते म्हणाले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनीही उर्वरित लोकल गाड्यांमध्ये कॅमेरा बसवण्याचे कामही रेल टेल करत असल्याचे स्पष्ट केले.

 

गुन्हेगारी रोखण्यास मदत

२०१९ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेवर एकूण ३३ हजार ८२८ विविध गुन्हे दाखल झाले. जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ८ हजार २७ गुन्हे घडले आहेत. चोरी, दरोडे, विनयभंग, मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न यासह अन्य गुन्ह््यांचा समावेश आहे. यात लोकलमधील प्रवासात अधिकतर चोरी, विनयभंगाचे गुन्हे दाखल असतात. त्यामुळे गुन्हेगाराचा शोध घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चांगलाच उपयोग होऊ शकतो; परंतु कॅ मेरे बसवण्याची कामेही संथगतीनेच होत आहेत.

 

इथेही संथगती

प्रवाशांची होणारी घुसखोरी व त्यांच्या सुरक्षेसाठीही अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले होते; परंतु दोन्ही मार्गांवर या कामालाही गती मिळालेली नाही.