देशभरात करोना संसर्गाची दुसरी लाट आलेली आहे, राज्यातही दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग थोपवण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले असून, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) पत्रकारपरिषदेत बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

“मला एक मोठा प्रश्न केंद्र सरकारला विचारायचा आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना मला विनंती करायची आहे, की लसीकरणाचा उत्सव कसा करणार? लसच उपलब्ध नाही, लसींचा पुरवठाच नाही.” असं अस्लम शेख म्हणाले आहेत. तसेच, “आज मुंबईत २ लाख ३५ हजारपर्यंतच लसींचा साठा शिल्लक आहे. हा साठा दोन किंवा तीन दिवसच पुरणार आहे.” अशी देखील यावेळी त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्राने ओलांडला मोठा टप्पा; एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण

तर, करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून मागील काही दिवसांत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले आहे.

अंगावर आलेल्या करोनाला आता शिंगावर घेणार – आयुक्त इक्बालसिंग चहल

दरम्यान, अस्लम शेख यांना पत्रकारपरिषदेत सांगितलं की, “महाराष्ट्र सरकारने कुठल्याहीप्रकारे अचानक लॉकडाउन किंवा गाईडलाइन्स लोकांवर लादलेली नाही. आमच्या टास्क फोर्सचा अहवाल येतो आहे, अगोदरपासून आम्ही लोकांना सांगतो आहे, दोन महिन्यांपासन मुख्यमंत्री व मी स्वतः देखील लोकांना सांगतो आहे की गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच बाहेर पडा अन्यथा आपल्याला निर्बंध कठोर करावे लागतील. आम्ही गाईडलाइन्स देखील बदलत गेलो. आम्ही हळूहळू कारवाई करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी गाईडलाइन्स देखील कठोर करण्यात आली. शेवटी आम्ही नाईट कर्फ्यू लावला व त्यातून लोकांना इशारा दिला की, अशी परिस्थिती दिवसा देखील येऊ शकते. नंतर दिवसा देखील आम्ही प्रतिबंध कठोर केले. त्यानंतर आता वीकेंड लॉकडाउन करण्यात आला. लोकांची परिस्थिती अचानक बिकट होता कामा नये व लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही वेळोवेळी लोकांसमोर येत आहोत. अजुनही सांगतो आहे व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील काल झालेल्या बैठकीत सांगितलं की, कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर लोकांना एक-दोन दिवसांचा वेळ दिला जावा.”

मुंबईत रात्री अत्यावश्यक सेवानांच परवानगी; पालकमंत्री शेख यांची माहिती

तसेच, “आम्ही मागणी केली होती की ज्या भागांमध्ये रूग्ण वाढत आहेत, तिथे वयाची अट टाकू नका. गुजरातमध्ये काही ठिकाणी तरूणांना देखील लसीकरण केले गेले आहे. महाराष्ट्रातही किमान जिथं रूग्ण वाढत आहेत त्या भागात आम्हाला लसीकरण करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे, मात्र ते देखील झालेलं नाही.” असंही यावेळी अस्लम शेख यांनी बोलून दाखवलं.