चर्चगेट स्थानकातील प्रयोगाच्या अपयशानंतर पश्चिम रेल्वेच्या प्रयत्नांना कंपन्यांचा हातभार
गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम रेल्वेवर सतत बातम्यांमध्ये असलेल्या चर्चगेट स्थानकातील सौरऊर्जेचा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. डिसेंबर २०१३मध्ये जाहीर झालेल्या या प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झालेली नाही. मध्यंतरी हा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली होती. मात्र त्यानंतर या प्रकल्पाला पुन्हा धुगधुगी मिळाली होती; पण आता माटुंगा रोड स्थानकावर कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहणार आहे. हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेपर्यंत पूर्ण होणार आहे.
रेल्वेने २०१३मध्ये चर्चगेट स्थानकात सौरऊर्जेद्वारे विद्युत निर्मितीची घोषणा केली होती. १ जानेवारी २०१४ रोजी ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. चर्चगेट स्थानकाच्या छतावर सौरपटल उभारून ही निर्मिती करण्याचे नियोजन होते. मात्र त्यानंतर निधीअभावी हा प्रकल्प बारगळल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी हा प्रकल्प पेटाऱ्यातून पुन्हा बाहेर काढण्यात आल्याचेही पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
आता रेल्वेने माटुंगा रोड या तुलनेने छोटय़ा स्थानकात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. प्रवासी सोयीसुविधा पुरवण्यासाठी रेल्वेने कंपन्यांना सामाजिक दायित्व निधीसाठी आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आता ‘अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’च्या वतीने माटुंगा रोड येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. माटुंगा रोड स्थानकाला दर महिन्यासाठी ५५०० युनिट वीज लागते. तेवढी वीज उभारण्यासाठी प्रत्येकी २५० व्ॉट ऊर्जा निर्माण करणारे ४८ सौरपटल स्थानकावर बसवण्यात येणार आहेत. त्यातून १२००० व्ॉट एवढी ऊर्जा दर दिवशी निर्माण होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.