मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) पश्चिम व मध्य रेल्वेवरील १८ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी आठ स्थानकांच्या कामांसाठी काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. सरकते जिने, उदवाहक,  पादचारीपूल एकमेकांना जोडणे या कामांसह अन्य काही सुविधाही करण्यात येणार आहेत.

उपनगरीय स्थानकांतील अरुंद फलाट, दुकाने यामुळे प्रवाशांना चालणेही कठीण होते. त्यातच अपुरे पादचारीपूल, सरकत्या जिन्यांचा अभाव, प्रसाधनगृहांची कमतरता आदी प्रश्नही आहेत. त्यामुळे ‘एमआरव्हीसी’ने मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील १९ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला. यापैकी खार स्थानकाच्या विकासाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले आहे. आता अन्य १८ स्थानकांच्या विकासकामाला गती देण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या. यापैकी आठ स्थानकांच्या निविदांना प्रतिसाद मिळाल्याची माहिती ‘एमआरव्हीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

या स्थानकांमध्ये मुलुंड, डोंबिवली, नेरळ, कसारा, मुंबई सेन्ट्रल, सांताक्रुझ, कांदिवली आणि मीरा रोड यांचा समावेश आहे. नेरळ आणि कसारा स्थानकांच्या विकासासाठी तीन निविदा आणि मुलुंड, डोंबिवली, मुंबई सेन्ट्रल, सांताक्रुझ, कांदिवली आणि मीरा रोड स्थानकासाठी प्रत्येकी एक निविदा प्राप्त झाली आहे. लवकरच निविदा अंतिम करून पावसाळय़ानंतर स्थानकांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

विकास कामे..

* स्थानकातील सर्व पादचारीपूल परस्परांना जोडणार

* नवीन पादचारीपुलांसह पादचारीपुलांची दुरुस्ती

* नवीन फलाटांची उभारणी, जुन्या फलाटांचा विस्तार

*  सरकते जिने, उदवाहक, फलाटांवर नवीन ‘इंडिकेटर’

या दहा स्थानकांसाठीही निविदा..

घाटकोपर, विक्रोळी, भांडुप. जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा या स्थानकांसाठीही निविदा प्रक्रिया सुरू आहे.