मुंबई: मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी झाल्याने पालिकेने शुक्रवारी केवळ महिलांसाठी लसीकरण सर्व केंद्रावर आयोजित केले आहे. सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे सहापर्यंत होणाऱ्या या लसीकरणामध्ये महिलांना पहिली किंवा दुसरी मात्रा घेता येणार आहे.

महिलांसाठी आयोजित केलेले हे लसीकरण पूर्णपणे पूर्वनोंदणीशिवाय असणार आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्रे आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि करोना केंद्रे येथील लसीकरण केंद्रांवर थेट (वॉक इन) लस घेता येईल. पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा देण्यात येतील. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने शुक्रवारी ऑनलाइन पूर्वनोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.