तोट्यात असतानाही बस घेण्याचा घाट, एसटीतील संघटनांचा तीव्र विरोध

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बस धावत असतानाच आता प्रवाशांसाठी साध्या बसही भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. अशा ५०० बससाठी ई-निविदा काढली जाणार आहे. त्यावर चालक खासगी कंत्राटदाराचा तर वाहक एसटीचा असेल. एसटी तोट्यात असतानाही भाडेतत्त्वावर बस घेण्याचा घाट का, असा सवाल उपस्थित करत एसटी महामंडळातील कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार ५०० बस असून यामध्ये साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहे. आता महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरिता साध्या बस आठ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

भाडेतत्त्वावर बस पुरविणे, त्याचे चालन व देखभालीसाठी संस्था किंवा समूहाची निवड केली जाणार असून त्यासाठी ई-निविदा मागविण्यात येणार आहेत. निविदापूर्व बैठकही १७ ऑगस्टला आयोजित केली आहे. मुळातच एसटी महामंडळाला भाडेतत्त्वावरील शिवशाही बसचा अनुभव फारसा चांगला नाही. शिवाय एसटी महामंडळाला गेल्या काही वर्षांत तोटा सहन करावा लागत असून करोनाकाळात उत्पन्न प्रचंड घटले आहे. तरीही भाडेतत्त्वावर बस घेण्याचा घाट का घालण्यात येत आहे, असा सवाल एसटीतील संघटनांनी उपस्थित केला आहे.

उत्पन्न किती?

मार्च २०२० पूर्वी एसटी बसमधून दर दिवशी ६० लाख प्रवासी प्रवास करीत होते. दिवसाला २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. आता १० हजार बस धावतात. आजघडीला १४ लाख प्रवासी प्रवास करीत असून आठ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे.\

पर्यायाचा विचार का?

एसटी गाड्यांचे आयुर्मान संपताच त्या भंगारात काढल्या जातात व त्याबदल्यात बांधणी करून नवीन गाड्या ताफ्यात दाखल होतात. वर्षाला आयुर्मान संपलेल्या गाड्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नवीन गाड्या दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे बसची बांधणी करणे व त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा पर्याय पुढे आल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाड्याने बस घेण्यास संघटनेने विरोध केला आहे. एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. करोनामुळे अद्याप लोक प्रवास करायला तयार नाहीत. रोजंदार गटाचे चालक-वाहक, प्रशिक्षणार्थी अजून वेतनाशिवाय घरीच बसून आहेत. मग भाड्याने गाड्या घेण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न आहे. याबाबत संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल.     -संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट

ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी महामंडळाने गाड्या घेण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली असताना त्याऐवजी भाड्याने गाड्या घेण्याचा अट्टहास का? कुठे तरी पाणी मुरत असल्याचा संशय निर्माण होत आहे. -श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस</strong>