आमदारांच्या नाराजीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तारही टप्प्याटप्प्याने?

सर्वच जागा भरल्या तर इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण होईल.

(संग्रहित छायाचित्र)

काही जागा रिक्त ठेवून अधिवेशनानंतर विस्तार

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मात्र तीनही पक्षांच्या कोटय़ातील काही जागा रिक्त ठेवून हा विस्तार केला जाईल, असे सांगण्यात येते. सर्वच जागा भरल्या तर, मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून, दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा विचार असल्याचे आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याआधी सत्तावाटपाबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार शिवसेना १५, राष्ट्रवादी-१६ व काँग्रेसला १२ मंत्रिपदे वाटय़ाला येणार आहेत. मात्र तीनही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर तिन्ही पक्षांतील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर विस्तार करून अन्य मंत्र्यांचा समावेश करण्याचे ठरले. परंतु तीनही पक्षांमधील वाद अजून मिटलेला नाही. त्यामुळे ज्यांनी शपथ घेतली, त्यांचे खातेवाटपही रखडले होते. अखेर दोन आठवडय़ांनंतर गुरुवारी सहा मंत्र्यांकडे त्या त्या पक्षाच्या वाटय़ाला येणाऱ्या खात्यांचे वाटप करण्यात आले.

राज्य विधिमंडळाचे १६ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. २१ डिसेंबपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती एका मंत्र्याने दिली. परंतु तीनही पक्षांच्या कोटय़ातील काही जागा रिक्त ठेवल्या जातील.

सर्वच जागा भरल्या तर इच्छुक आमदारांमध्ये नाराजी निर्माण होईल. त्यामुळे दोन टप्प्यांत विस्तार केला जाईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. हिवाळी अधिवेशनानंतर पहिला टप्पा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Step by step cabinet expansion in uddhav thackeray government zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या