संघटना-व्यवस्थापनाच्या वादात रुग्णांचे हाल; उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू

अंधेरीतील राज्य विमा निगम महामंडळाच्या कामगार रुग्णालयातील कर्मचारी संघटना व व्यवस्थापनाच्या वादात सुरू झालेल्या संपाचा फटका येथील रुग्णांना बसू लागला आहे. रुग्णालयात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे अतिदक्षता विभाग बंद पडल्याने एका २६ वर्षीय रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला.

नीरज तिवारी (२६) या तरुणाला छातीत दुखत असल्याने सकाळी ८.०० वाजता अंधेरीतील कामगार रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या वेळी रुग्णाचा रक्तदाब आणि शरीरातील ऑक्सिजन अतिशय कमी असल्याचे तपासणीत उघड झाले. अशा वेळी रुग्णाला तातडीने व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. ही सुविधा अतिदक्षता विभागात उपलब्ध आहे. मात्र हा विभाग बंद असल्याने नीरज तिवारी याला योग्य उपचार उपलब्ध झाले नाही आणि त्याचा रुग्णालयातील अपघात विभागातच मृत्यू झाला.

गेले तीन दिवसांपासून राज्य विमा निगम महामंडळाच्या रुग्णालयातील १५० परिचारिका संपावर आहेत. त्यामुळे येथील कामकाज कोलमडले आहे. दररोज या रुग्णालयात ३० ते ३५ रुग्ण दाखल होतात. मात्र बुधवारी केवळ ४ नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात आले असून इतर सर्व रुग्णांना केईएम, नायर, कूपर या रुग्णालयात पाठविले जात आहे. संपात सामील नसलेल्या १० ते १५ परिचारिकांवर ३५० खाटांचे रुग्णालय चालविले जात आहे. परिचारिकांच्या संपामुळे ज्येष्ठांचे अतिदक्षात विभाग बंद करण्यात आले असून लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात केवळ ४ ते ५ रुग्ण आहेत. शिवाय बाह्य़ रुग्ण विभागाची सकाळी ९ ते सायं. ४ ही वेळ कमी करून दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

जोगेश्वरी येथे राहणारे उदय गमरे यांची आई ललिता गमरे यांच्या मेंदूतून रक्तस्राव होत असल्याने गुरुवारी दुपारी त्यांना कामगार रुग्णालयात आणण्यात आले; परंतु अपघात विभागातील डॉक्टरने परिचारिकांच्या संपामुळे नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला.

बदलीविरोधात संप

औरंगाबाद येथे राज्य विमा निगम महामंडळाची नवीन बाह्य़रुग्ण विभाग सुरू झाला आहे. या बाह्य़रुग्ण विभागात अंधेरीतील कामगार रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची परस्पर बदली केल्यामुळे ‘संघटना विरुद्ध व्यवस्थापन’ हा वाद सुरू झाला आहे. यापूर्वी पुण्यातील बाह्य़रुग्ण विभाग बदली करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची संमती घेतली होती. तसेच स्वेच्छेने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य  दिले होते. मात्र नव्याने आलेल्या रुग्णालय प्रमुखांनी संघटनेविरोधात पावले उचलत सात वर्षांपासून रुग्णांना सेवा देणारे संघटनेचे उपाध्यक्ष कैलास धायल यांनाच लक्ष्य केले आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कर्मचारी संघटनेचे सचिव जोधराज बैरवा यांनी सांगितले.

व्यवस्थापन ठाम

रुग्णालयाच्या प्रमुखांनी मात्र ही बदली मागे घेण्यास नकार दिला आहे. संघटनेच्या सचिवाला औरंगाबाद येथील बाह्य़रुग्ण विभागात जावेच लागेल, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजीव गुरुमुखी यांनी सांगितले. तर संपामुळे नीरज तिवारी या रुग्णाचा मृत्यू झाला नसून हा रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याने त्याला वाचविणे शक्य झाले नाही, असेही ते म्हणाले.