अन्वय सावंत
मुंबई : कॅरम हा विरंगुळय़ाचा खेळ. पण त्यातही कसब आलेच. स्ट्रायकर हातात आला की एका डावातच सोंगटय़ांना ‘पॉकेट’ दाखवणारे निष्णात कॅरमपटू अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण दोन्ही हात नसल्याने जिद्दीच्या जोरावर पायाच्या बोटांनी कॅरम खेळून तितकेच कौशल्य मिळवणाऱ्या हर्षद गोठणकरसमोर सारे फिके वाटतात. सध्या समाजमाध्यमांवर हर्षदच्या नैपुण्याच्या अनेक चित्रफिती व्हायरल होत असताना त्याच्या जिद्दीची चर्चाही सुरू आहे.
हर्षदला जन्मापासून दोन्ही हात नाहीत. वडील शंकर हे रिक्षाचालक, तर आई वनिता गृहिणी असल्याने घरची परिस्थिती तशी सामान्यच. मात्र, त्यांनी कायम हर्षदला प्रोत्साहन देत स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. सोमय्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षदला सुरुवातीला फुटबॉलची आवड होती. मात्र खेळताना तोल सांभाळणे त्याला अवघड जायचे. तरीही वडील आणि अन्य मित्रांनी त्याला खेळाची आवड जोपासत राहण्यास सांगितले. मग तो कॅरमकडे वळला; पण तिथेही त्याला संघर्ष करावा लागला.
‘मी १२वीत असताना कॅरम खेळण्यास सुरुवात केली. मी हा खेळ पायाने खेळत असल्याने मला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. कॅरम बोर्डवर पाय ठेवणे योग्य नसल्याचे मला सांगितले गेले. तसेच मला सोंगटय़ांवर नियंत्रण मिळवण्यातही अडचण यायची. मात्र, मी जिद्दीने खेळत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला अनेक महाविद्यालयीन स्पर्धा जिंकण्यातही यश आले,’ असे हर्षदने सांगितले.
कुल्र्याचा रहिवासी हर्षद कॅरम आणि फुटबॉलव्यतिरिक्त क्रिकेट, जलतरण, कबड्डी हे खेळही खेळतो. मात्र, त्याचा कॅरम या खेळातच यशस्वी मजल मारण्याचा मानस आहे. ‘पायाच्या साहाय्याने कॅरम खेळत असल्याने मला व्यावसायिक किंवा राज्यस्तरीय स्पर्धामध्ये खेळण्याची मुभा नाही. मी काही जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये सहभागी होतो. मात्र, भविष्यात मला कॅरममध्येच उल्लेखनीय कामगिरीसह स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे,’ असे हर्षद आवर्जून म्हणाला.
हर्षदची पायाने कॅरम खेळतानाची चित्रफित पाहून भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही भारावून गेला. गेल्या वर्षी त्याने ‘ट्विटर’च्या माध्यमातून हर्षदचे कौतुकही केले होते. ‘‘अशक्य आणि शक्य यातील फरक केवळ व्यक्तीच्या जिद्दीत असतो. हर्षद गोठणकरने मला हे शक्य आहे, हे ब्रीदवाक्य स्वीकारले आहे. कोणतीही गोष्ट शक्य करण्यासाठीची त्याची धडपड मला खूप भावते. आपण सर्वानी त्याच्याकडून हे शिकले पाहिजे,’’ असे सचिन म्हणाला.
दोन्ही हात नसतानाही जिद्दीने कॅरम खेळणाऱ्या हर्षदचे मला कौतुक आहे. परंतु त्याच वेळी मला त्याच्यासाठी वाईटही वाटते. हाताने कॅरम खेळण्याच्या नियमामुळे त्याला आमच्या स्पर्धामध्ये सहभागी होता येत नाही. मात्र, तो गुणी खेळाडू असल्याने संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला आर्थिक साहाय्य केले. तसेच भविष्यात एखादा प्रदर्शनीय सामना खेळवून त्यातून आणखी आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. – अरुण केदार, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॅरम संघटना
वडिलांची शिकवण
दोन वर्षांपूर्वी हर्षदच्या वडिलांचे निधन झाले. हर्षदच्या जडणघडणीत वडिलांची खूप महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी हर्षदला तू इतरांपेक्षा वेगळा नाहीस, तुला कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, हे पटवून दिले. त्यांची ही शिकवण लक्षात ठेवूनच हर्षद पुढील वाटचाल करतो आहे. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हर्षद सध्या अर्धवेळ काम करतो. यातून त्याला जेमतेम मानधनच मिळत असल्याने तो सरकारी नोकरीच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी त्याला महाराष्ट्र कॅरम संघटनेकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.