मुंबई : केंद्र सरकार वा भाजपविरोधातील आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर यांसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, लोकशाहीच धोक्यात आली आहे, त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने आपणहून हस्तक्षेप करून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर थांबवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापा टाकला. त्या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, बेकायदा दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी आपण आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अ‍ॅड्. सतीश उके हे या प्रकरणातील आमचे वकील आहेत. परंतु अचानक त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकून फाइली, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले आहेत. उके हे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसह इतर प्रकरणावरही काम करत आहेत. त्यांचा आवाज दडपण्यासाठीच ही कारवाई केली आहे. हा एकटय़ा उके यांचा प्रश्न नसून भाजप सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवला तरी त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.

यूपीएचा अध्यक्ष काँग्रेस ठरवेल

राष्ट्रीय स्तरावर संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) पुनर्रचना करण्याची चर्चा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे, अशीही मागणी पुढे केली जात आहे. त्याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता, यूपीएचा अध्यक्ष कोण असावा हे काँग्रेसश्रेष्ठी ठरवतील असे उत्तर त्यांनी दिले. मात्र सध्या त्यावरून वाद करण्यापेक्षा भाजपच्या अत्याचारी राजवटीच्या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.