महसूल राज्यमंत्री सुरेश धस मुंबईहून बीडच्या दिशेने जात असताना खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरची दिशा बदलली आणि ते वाडय़ाच्या दिशेने आले. त्यामुळे कुडूस जवळील कोंडला येथे एका माळरानावर शुक्रवारी सकाळी त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. या भागात सकाळपासूनच धुक्याचे वातावरण होते.
कोंडला येथील बांधणपाडय़ाजवळ उतरविण्यात आलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. अध्र्या तासानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण घेतले आणि बीडच्या दिशेने निघून गेले. या हेलिकॉप्टरमध्ये राज्यमंत्री सुरेश धस आणि त्यांचे दोन खासगी स्वीय सहाय्यक होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या नागपूर येथील अधिवेशनात वाडय़ातील बेकायदेशीर दगडखाणींच्या प्रश्नांवर विधीमंडळात उत्तर देताना राज्यमंत्री धस यांनी वाडय़ात येऊन प्रत्यक्ष पाहाणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी त्यांचे हेलिकॉप्टर वाडय़ात अचानक दाखल झाल्याने राज्यमंत्री धस दगडखाणींची पाहाणी करण्यासाठी आले की काय, या धास्तीने महसूल अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली.