स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या जुलैमध्ये वाढली असून पहिल्या पंधरा दिवसांत रुग्णांची संख्या ३५ वर गेली आहे. जूनमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या केवळ १९ होती तसेच पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचा जोर वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर लेप्टोसोबत स्वाइन फ्लूच्या रुग्णांवरही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. दरम्यान स्वाइनचे रुग्ण केवळ मुंबईत आढळत असून राज्यात इतरत्र या आजाराची साथ नाही.
स्वाइन फ्लू हा हवेवाटे पसरणारा आजार असून पावसानंतर तसेच हिवाळा संपताना या विषाणूचे प्रमाण वाढते. कोरडय़ा वातावरणात तसेच तापमानात सतत बदल होत असताना हा विषाणू वेगाने वाढतो. त्यामुळे पावसात स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी असते. मात्र या वेळी केवळ १५ दिवसांत स्वाइन फ्लूच्या ३५ रुग्णांची नोंद झाली आहे. जूनपर्यंत स्वाइन फ्लूचे १८४२ रुग्ण होते. आता त्यांची संख्या १८७७ पर्यंत वाढली असून आतापर्यंत २३ मृत्यू झाले आहेत. इतर विषाणूंप्रमाणेच स्वाइन फ्लूचे विषाणूदेखील आता हवेत स्थिरावले आहेत. स्वाइन फ्लूची चाचणी करण्याची जागृती वाढल्याने त्याची नोंद अधिक होते. अन्यथा इतर फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लूदेखील केवळ औषध घेऊन बरा होतो, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांवर तसेच स्वाइन फ्लूच्या साथीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद वाढली असली तरी राज्याच्या इतर भागात मात्र स्वाइन फ्लूची साथ नाही. स्वाइन फ्लूचे रुग्ण आता वर्षभर आढळत असले तरी या काळात मुंबई वगळता कोणत्याही भागात त्यांची संख्या वाढलेली दिसत नाही, अशी माहिती आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.