मुंब्रा येथील एका ख्यातनाम शाळेने मुलींसाठी हिजाब बंदीचा निर्णय घेतल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. शाळेच्या आवारात हिजाब किंवा नकाब परिधान करु नये, असा फतवा शाळेने काढला आहे. हिजाबमुळे मुलींचा चेहरा झाकला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हा निर्णय घेतल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंब्रा येथील सिम्बॉयसिस शाळेने नुकतेच एक पत्रक काढले आहे. ‘शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी हिजाब परिधान केले असेल तर शाळेत प्रवेश करताना त्यांना ओळख पटवण्यासाठी स्वतःचा चेहरा दाखवावा लागेल’, असे पत्रकात म्हटले आहे. तसेच विद्यार्थिनींनाही हिजाबबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. शाळेच्या आवारात मुलींना हिजाब परिधान करता येईल, मात्र त्यात चेहरा दिसेल अशा पद्धतीनेच तो परिधान करावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे. ‘शाळेत आम्ही हिजाब परिधान करतो, पण आम्हाला चेहरा झाकता येत नाही’ असे एका मुलीने सांगितले.

शाळेचे ट्रस्टी कमलराज देव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ‘सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु असताना काही विद्यार्थी हिजाब परिधान करुन शाळेतून पळून जायचे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना नेमके कोण शाळेबाहेर गेले हे सांगणे कठीण व्हायचे’, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हिजाब परिधान केलेल्या दोन महिला शाळेत आल्या. मुलांना घरी न्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. वर्गशिक्षकांनी दोन्ही मुलांना बोलावलेही, मात्र तोपर्यंत दोन्ही महिलांनी तिथून पळ काढला’, त्यामुळेच हा निर्णय घेतला, असे देव यांनी स्पष्ट केले.

काही पालकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या धार्मिक गोष्टींमध्ये शाळा प्रशासन हस्तक्षेप करु शकत नाही, असे पालकांनी म्हटले आहे. तर काही पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत, पण सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येकाने प्रवेश करताना ओळखपत्रासाठी कॅमेऱ्यासमोर स्वतःचा चेहरा दाखवणे गरजेचे आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.