प्राध्यापकांच्या संपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने २० मार्चला काढलेल्या आदेशांमुळे २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘तृतीय वर्ष वाणिज्य’ (टीवायबीकॉम) शाखेच्या परीक्षेवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले असून या आदेशांमुळे प्राध्यापकांच्या सहभागाशिवायही परीक्षा घेणे शक्य होणार आहे. परिणामी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने टीवायबीकॉम परीक्षा पुढे न ढकलता वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय शनिवारी घेतला. मुंबई, ठाणे, रायगड आदी भागातील तब्बल २७० परीक्षा केंद्रांवर ८५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठातील शिक्षकांचा सर्व प्रकारच्या परीक्षांवर बहिष्कार आहे. सरकारवर दबाब आणण्यासाठी सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी प्राध्यापकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच, प्राध्यापकांच्या सहकाराशिवाय परीक्षा घेणे शक्य नसल्याने टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, असे प्राचार्याच्या संघटनेचे म्हणणे आहे. पण, सरकारच्या आदेशामुळे प्राध्यापकांच्या सहकाराविना परीक्षा घेणे विद्यापीठ व महाविद्यालयांना शक्य होणार आहे.
परिणामी वेळापत्रक पुढे ढकलण्याची शक्यता परीक्षा मंडळाने फेटाळून लावली.
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक लांबवून २८ मार्चपर्यंत होता येईल तितक्या परीक्षा घेऊन उर्वरीत परीक्षा बीएस्सीची लेखी परीक्षा झाल्यानंतर घेण्यात येतील, असे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. टीवायबीएस्सीची लेखी परीक्षा २ एप्रिलला तर टीवायबीएची ५ एप्रिलपासून सुरू होते आहे.