केंद्रीय प्रवेश परीक्षांच्या तयारीकरिता भलेही राज्याबाहेरच्या शिक्षकांची गरज क्लासचालकांना भासत असेल, पण डॉक्टर, इंजिनीअर किंवा आयआयटीयन्स बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी (एचएससी) संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घ्या, असा सल्ला आजकाल काही बडय़ा क्लासचालकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. अशा महाविद्यालयांत नसलेले हजेरीचे बंधन हे यामागचे मुख्य कारण आहे.
अभ्यासाला अधिक वेळ देण्याच्या सबबीखाली हजेरीबाबतचे नियम गुंडाळून ठेवण्याचा हा थिल्लरपणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) किंवा इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी (आयसीएसई) संलग्नित उच्च माध्यमिक शाळांमध्ये चालत नसल्याने क्लासचालकांकडून विद्यार्थ्यांना एचएससीचा अभ्यासक्रम देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला जात आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता क्लासचालकांकडून जे मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजिले जातात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असे मार्गदर्शन केले जाते.
खरे तर नीट, जेईईचा अभ्यासक्रम राबविण्यात केंद्रीय शिक्षण मंडळांनी (विशेषत: सीबीएसई) फार पुढचा टप्पा गाठला आहे. या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम बहुतेक करून सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारलेला
आहे.
 काही ठरावीक अपवाद वगळता केंद्रीय शिक्षण मंडळांच्या बहुतांश शाळा वर्गातील उपस्थितीबाबत गंभीर असतात, पण बारावीच्या मुलांचे वर्गातील ‘मास बंकिंग’ एचएससी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नित्याचीच बाब आहे. त्यामुळे सीबीएसई-आयसीएसई विद्यार्थीही एचएससी बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेतात.
शिक्षक शोधण्यासाठीही आता ‘कन्सल्टन्सी’
केंद्रीय प्रवेश परीक्षांमुळे आता शिक्षकांच्या नेमणुकांमध्येही खासगी कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस आपले बस्तान बसवू पाहात आहेत. ‘या सेवा कंपन्या एकाच वेळी क्लासचालक आणि महाविद्यालयांनाही सेवा पुरवितात. कोणत्या जिल्ह्य़ातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांना बसतात याचा रीतसर अभ्यास करून शिक्षक पुरविणाऱ्या सेवा कंपन्या संबंधितांशी संपर्क साधतात,’ असे नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्रा. एस. बी. चव्हाण यांनी सांगितले.
‘आम्ही जेईई-अ‍ॅडव्हान्स या परीक्षेची तयारी करवून घेणास सक्षम असलेल्या खास शिक्षकांच्या शोधात आहोत म्हटल्यावर अशा अनेक सेवा कंपन्यांनी आमच्याशी सध्या संपर्क साधत आहेत,’ अशी पुष्टी त्यांनी जोडली.
एखाद्या महाविद्यालयाकडून किंवा क्लासकडून शिक्षकांबद्दल विचारणा झाल्यास ते त्यांचा बायोडेटा पाठवून देतात. मग, त्या शिक्षकाला प्रवास, निवास आदी भत्ता देऊन कामाच्या ठिकाणी बोलाविले जाते. मग मुलाखत, विद्यार्थ्यांसमोर शिकविण्याचे, शंकानिरसन करण्याचे कसब वगैरे तपासून त्यांना कामावर घ्यायचे की नाही हे ठरविले जाते. या बदल्यात संबंधित सेवा कंपन्या प्रत्येक उमेदवाराकडून त्याच्या पहिल्या वेतनातील काही हिस्सा कमिशन म्हणून घेते.