scorecardresearch

घोटाळेबाज, पानमसाला व जुगाराच्या ॲपची जाहिरात करणाऱ्यांचा पद्म पुरस्कार परत घ्या – मनसे नेते बाळा नांदगावकर

पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. त्यांचा मान राखला गेला पाहीजे, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

घोटाळेबाज, पानमसाला व जुगाराच्या ॲपची जाहिरात करणाऱ्यांचा पद्म पुरस्कार परत घ्या – मनसे नेते बाळा नांदगावकर
चंदा कोचर यांच्या पद्मविभूषण पुरस्कारावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची टीका

बँकिंग क्षेत्रातील कर्तुत्वान महिला म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, त्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना काही दिवसांपुर्वीच आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. बँकिंग क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे चंदा कोचर यांना २०११ साली पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांची अटक झाल्यानंतर मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी चंदा कोचर यांचा पद्म पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे.

पद्म पुरस्कारांचा मान राखावा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत सविस्तर ट्विट केले आहे. “पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न हे कोणतेही साधे पुरस्कार नव्हे तर आपल्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार आहेत. आर्थिक घोटाळ्यात अटक झालेल्या ICICI च्या माजी CEO “चंदा कोचर” यांनाही पद्मभूषण देण्यात आला होता. अशा घटनेमुळे या पुरस्कारांचे पावित्र्य कमी होते. त्यामुळे अशा घटनांमध्ये यांचे पुरस्कार सरकारने काढून अशा पुरस्कारांचा मान राखावा.”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विश्लेषण: चंदा कोचर यांच्यासाठी पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन कसे ठरले डोकेदुखी? काय आहे 3250 कोटींच्या कर्जाचं प्रकरण?

पानमसाला, जुगाराची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींचाही पद्म पुरस्कार परत घ्या

यासोबतच “अनेक सेलिब्रिटी केवळ पैशांसाठी सर्रास पणे पानमसाला, अनेक जुगाराचे ॲप यांच्या जाहिराती करतात त्यांच्या बाबतीतही सरकारने पद्म पुरस्कार परत घेण्याचा विचार करावा. इथून पुढेही असे मोठे पुरस्कार देताना विशेष काळजी घ्यावी कारण पद्म पुरस्कार हा देशाचा मान आहे.”, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना देण्यात येतात. सर्वोच्च नागरी पुरस्कार असा बहुमान असलेल्या पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तिंना समाजात आदराने पाहिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पद्म पुरस्काराभोवती वादाचे वलय निर्माण झाले आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू यांना पद्म पुरस्कार देण्यावरुन लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवर केलेल्या मागणीला देखील अनेक लोक पाठिंबा देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 12:05 IST

संबंधित बातम्या