तीन महिन्यांचे सीसीटीव्ही फुटेज बघणार
भावेश नकाते प्रकरणानंतर रेल्वेने दरवाजांवर उभे राहणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी रेल्वे सुरक्षा दलाला सूचना केल्या आहेत. आता रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मागील तीन महिन्यांचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून या टोळक्यांचा छडा लावणार आहेत. त्यानंतर या टोळक्यांमधील सदस्यांना पकडून कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय या टोळक्यांना दारात उभे राहणे शक्य होऊ नये, यासाठी दरवाजांवरील पाणी वाहून जाणाऱ्या पट्टय़ाही काढण्यात येणार आहेत.
भावेश नकाते प्रकरणात तो त्या गाडीत नेहमी चढत नव्हता. तो पडला त्या वेळी दरवाजातील कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच गाडीत जागा असूनही त्याला मुद्दामहून आत घेतले नसल्याचे दिसत होते. त्यातच गेल्या काही दिवसांत दरवाजावरील टोळक्यांबाबतच्या तक्रारींतही वाढ झाली होती. याबाबत पश्चिम रेल्वेवर रेल्वे सुरक्षा दलाने एक मोबाइल नंबर जाहीर करून त्यावर टोळक्यांचे फोटो किंवा माहिती पाठवण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. प्रवाशांची ओळख गुप्त ठेवून पश्चिम रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा दल ही कारवाई करणार आहे.
मध्य रेल्वेने त्याच्या एक पाऊल पुढे जात प्रवाशांच्या तक्रारी येण्याआधी स्वत:हूनच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी रेल्वे सुरक्षा दलाला विविध सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांनुसार आता रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विविध स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण पाहणार आहेत. गेल्या तीन महिन्यांतील चित्रीकरण तपासून गाडीची वेळ, स्थानक, डबा, त्यात चढणारे प्रवासी, त्यांचे चेहरे आदी गोष्टींची तपासणी होणार आहे.
दरवाजात उभे राहून इतर प्रवाशांना गाडीत चढू देण्यास अटकाव करणाऱ्या टोळक्यांची ओळख या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पटवली जाईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्या-त्या स्थानकांवर त्या-त्या वेळी उभे राहून कारवाई करतील. त्यासाठी साध्या वेशात प्रवासी म्हणूनच प्रवास करण्यासारख्या क्लृप्त्याही वापरल्या जातील.

पट्टी काढणार..!
दरवाजात लटकणारे आणि स्थानकात एक बाजू अडवून धरणारे टोळक्यातील प्रवासी प्रामुख्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी डब्याच्या दरवाजावर असलेली पट्टी पकडत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता दरवाजावरील ही पट्टी काढून टाकण्याचा प्रयोगही मध्य रेल्वे करणार असल्याचे ब्रिगेडीअर सूद यांनी स्पष्ट केले.