कंपनीला त्यांच्या आवश्यकतेनुसार थेट उमेदवार निवडून देणारी यंत्रणा अस्तित्वात आली आहे. केतन दिवाण यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा उभी झाली असून सध्या टेलॉसिटीनावाने त्याचे काम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे जगातील अशी पहिली यंत्रणा भारतीयांनी भारतात उभारली असून लवकरच ती जागतिक पातळीवर पोहोचणार आहे.

नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आणि कंपन्यांना अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. पण केवळ नोकरीच नाही तर कंपन्यांना योग्य उमेदवार निवडून देण्यासाठीही यंत्रणा उभी होऊ लागली आहे. यात विशेष बाब म्हणजे जगातील अशी पहिली यंत्रणा भारतीयांनी भारतात उभारली असून लवकरच ती जागतिक पातळीवर पोहोचणार आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी हवी असेल तर सरकारच्या रोजगार केंद्रात नाव नोंदणी करण्याची एक पद्धत होती. या केंद्रात उमेदवाराने सर्व कागदपत्रांच्या प्रति दिल्या की त्याला एक कार्ड दिले जायचे. यानंतर या केंद्रातर्फे ज्या कंपन्यांना तसेच सरकारी विभागांमध्ये भरती प्रक्रिया होणार असेल त्याचा तपशील उमेदवाराला त्याच्या योग्यतेनुसार कळविला जायचा. एवढे झाले की केंद्राचे काम संपायचे. मग नोकरी मिळाल्यावर केंद्राच्या कार्ड क्रमांकाची नोंद केली जायची. यानंतर या केंद्रांची जागा खासगी संस्थांनी घेतली. मग यात फसवेगिरीचे प्रकार होऊ लागले. पुढे याची जागा ऑनलाइन संकेतस्थळांनी घेतली आणि हे सूत्र काहीसे यशस्वी झाले. या सर्वाच्या पुढे जाऊन काही तरी होणे ही उद्योगांना गरज होती. कारण उमेदवार सुचविल्यानंतर त्याची मुलाखत घेणे, त्याची माहिती तपासणे, एखादा उमेदवार मुलाखतीमध्ये ज्या पद्धतीने हुशारी दाखवेल तशीच कामात दाखवेल की नाही हे ताडणे अशा एक ना अनेक बाबी कंपन्यांना कराव्या लागत होत्या. पण आता कंपनीला त्यांच्या आवश्यकतेनुसार थेट उमेदवार निवडून देणारी यंत्रणा अस्तित्वात आली आहे. केतन दिवाण यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा उभी झाली असून सध्या ‘टेलॉसिटी’ नावाने त्याचे काम सुरू आहे. एखादी व्यक्ती काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करत असते. साधारणत: २०११ मध्ये केतनच्या डोक्यात ही संकल्पना आली. पण ही संकल्पना राबविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ते तंत्रज्ञान म्हणजे थ्रीजी फोरजी त्या काळात उपलब्ध नव्हते. मग त्याने स्थापन केलेली छोटेखानी कंपनीचे एका मनुष्यबळ विकास कंपनीत विलीनीकरण केले. पण तेथे केतनला त्याचे कंपनी स्थापन करण्याचे विचार स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर २०१४च्या अखेरीस केतनने आपली संकल्पना घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्याला त्याचा शाळेतील मित्र दिलप्रीत सिंग तब्बल १९ वर्षांनी भेटला. त्याने त्याची संकल्पना त्याच्यासमोर मांडली व रजत सुनेजा याची मदत घेत तिघांनी एप्रिल २०१५ मध्ये टेलॉसिटी कार्यरत केली.

कंपन्यांना उमेदवार सुचविणे किंवा उमेदवारांना अमुक एका कंपनीत नोकरी उपलब्ध आहे हे सुचविणे हे मनुष्यबळ विकास क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या करतात. पण यापलीकडे जाऊन कंपनीला योग्य उमेदवाराची निवड करून देण्याची जबाबदारीही टेलॉसिटी पार पाडते. यासाठी केतन, दिलप्रीत आणि रजत यांनी एक स्वतंत्र तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागाला करावी लागणारी अनेक कामे यंत्राच्या साह्य़ाने पूर्ण करणे शक्य होणार आहे. टेलॉसिटीचे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये उमेदवाराने लॉगइन करून त्याची मुलाखत सेव्ह करून ठेवायची आहे. कोणत्याही कंपनीला लागणारी प्राथमिक माहिती या मुलाखतीमधून विचारलेली असते. याचबरोबर त्याने कागदपत्रे अपलोड करून ठेवली की प्रत्येक कंपनीला कागदपत्रे सादर करण्याची गरज भासत नाही. तर कंपन्यांना काय आवश्यकता आहे. याचा तपशील कंपन्यांमध्ये त्याच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन टेलॉसिटी तयार करते. म्हणजे एखाद्या पदासाठी आठ वैशिष्टय़े  उमेदवारात असणे आवश्यक आहेत. ती वैशिष्टय़े त्या कंपनीच्या पदासाठी अ‍ॅपमध्ये सेव्ह केली जातात. मग जेव्हा त्या पदासाठी एखादा उमेदवार निवडला जातो तेव्हा त्याची मुलाखत या अ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाते. उमेदवार मुलाखत देत असताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांमधील भाव आदींचा अभ्यास करून एक गुणपत्रिका दिली जाते. ज्यात उमेदवार किती भावनिक बोलला, किती खरे बालेला, त्यात उमेदवाराला आवश्यक सर्व गुण आहेत की नाही आदी तपशील दिला जातो. ज्याच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाऊ शकते. ही निवड माणसाने केलेल्या निवडीपेक्षा अधिक योग्य ठरू शकणार आहे. कारण मुलाखत घेत असताना उमेदवारातील आवश्यक असे आठपैकी केवळ दोनच गुण आवडतात आणि त्याची निवड होते. पण यंत्र अशी चूक करत नाही तो सर्व गुण तपासणार यामुळे अधिक योग्य उमेदवार मिळणे शक्य होणार असल्याचे केतनने सांगितले. या तंत्रज्ञानासाठी स्वामित्व हक्काचे तब्बल १७ अर्ज करता येऊ शकणार आहेत. मात्र आमची कंपनी असल्यामुळे आम्ही केवळ सध्या दोनच अर्ज करणार असल्याचे केतनने सांगितले. टेलॉसिटीच्या या संकल्पनेला नुकताच ब्रिटन ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटतर्फे जगातील पहिले ‘टॅलेंट स्टॉक एक्स्चेंज’ म्हणून गौरविण्यात आले आहे.

गुंतवणूक आणि उत्पादनस्रोत

केतन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या या संकल्पनेला गुंतवणूकदारांनी चांगलीच साथ दिली. त्यांची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून आता ते दुसऱ्या फेरीकडे वळत आहेत. तसेच कंपनीत स्वतंत्र गुंतवणूकदारही आहेत. यामुळे सध्या कंपनीला चांगला निधी उपलब्ध आहे. कंपनीच्या अ‍ॅपमार्फत पाहिल्या जाणाऱ्या प्रत्येक व्हिडीओ मागे २००  रुपये आकारले जातात हेच कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत आहे.

भविष्यातील वाटचाल

हे तंत्रज्ञान आजही भारतात समजावून सांगणे खूप अवघड जात आहे. पण काही कंपन्या पुढे येत असून आमच्या तंत्रज्ञानचा स्वीकार करत आहेत. पण भारतातील हा ब्रँड जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी लवकरच ब्रिटन आणि अमेरिकेत सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केतनने नमूद केले. तसेच तंत्रज्ञानही अधिक विकसित केले जाणार असून लवकरच कंपन्यांमध्ये कियॉक्स मशिन्स बसविले जाणार आहेत. जिथे उमेदवार जाऊन त्याची मुलाखत चित्रित करू शकणार आहे. या अ‍ॅपमध्ये मुलाखत चित्रित झाल्यावर एक क्रमांक दिला जातो. तो क्रमांक उमेदवाराची ओळख राहतो. भविष्यात उमेदवाराने मुलाखत घेतल्यापासून त्याचे नेमणूकपत्र देऊन तो कामावर रुजू होईपर्यंतची सर्वच यंत्रणा स्वयंचलित व यंत्राच्या मदतीने करण्याचा आमचा मानस आहे. येत्या तीन ते चार वर्षांत हे शक्य होणार असल्याचा विश्वासही केतनने व्यक्त केला.

नवउद्यमींना सल्ला

आपल्या आसपासचे मित्र नवउद्योग सुरू करतात म्हणून मी पण करतो असे करू नका. नवउद्योग सुरू करताना तुम्हाला नेमका हा उद्योग का सुरू करायचा आहे, तो कोणत्या निकषांवर तुम्ही चालविणार आहात, त्याची नेमकी गरज काय आहे, या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला विचारा. याची उत्तरे मिळून त्यानुसार काम केल्यास तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार असा सल्ला केतनने दिला. याचबरोबर कंपनी स्थापन करताना आणखी एक कोणीतरी बरोबर असू द्या. जेणेकरून तुमचा प्रवास अधिक सुकर होईल. जर कंपनी स्थापन करणे शक्य नसेल तर आपल्या विचारांनी काम करणाऱ्या व आपल्याच संकल्पनेवर काम करणाऱ्या लोकांना भेटा व त्यांच्या कंपनीत तुमची संकल्पना घेऊन सहसंस्थापक म्हणून सहभागी व्हा, असा सल्लाही केतनने दिला.

Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit