मुंबई : मुंबईतील सर्व नाले गाळाने पूर्ण भरले आहेत. सर्वच नाल्यांमध्ये प्रचंड गाळ असून कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या पिशव्या तरंगत आहेत. नाल्यांची अवस्था अत्यंत भयावह असून अवघ्या दीड महिन्यात नालेसफाई झाली नाही, तर यंदा मुंबईत भयावह पूरस्थिती निर्माण होईल, असा दावा भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
भाजपने मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी सुरू केली आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली. या वेळी सध्याचे चित्र भयावह असल्याची चिंता शेलार यांनी व्यक्त केली. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी नालेसफाईची कामे या वर्षी एप्रिलचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप सुरू झालेली नाहीत. काही ठिकाणी तुरळक काम सुरू झाली आहेत. भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आणि कंत्राटदार यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे, असे सांगत भाजपने शिवसेनेवर टीका करतानाच नालेसफाईचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पूर्व, जुहू, वर्सोवा, गोरेगाव येथे पाहणी करण्यात आली. मोगरा नाला, गोरेगाव शास्त्रीनगर नाला, भगतसिंग नगर येथील नाल्यांची पाहणी करण्यात आली. सर्वच नाल्यांमध्ये प्रचंड गाळ तसाच पडून असून कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकच्या पिशव्या असे अत्यंत भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे, अवघा दीड महिन्याचा कालावधी आता शिल्लक असून दीड महिन्यात ही साफसफाई होईल का असा सवाल करीत दरवर्षीपेक्षा यंदा अधिक भयानक पूरपरिस्थितीला मुंबईकरांना सामोरे जावे लागेल असा इशारा शेलार यांनी दिला आहे.
दरम्यान, नालेसफाई उशिरा सुरू झाली असली तरी अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त यंत्रसामुग्री वापरून पावसाळय़ापूर्वी गाळ काढला जाईल, अशी प्रतिक्रिया पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.