scorecardresearch

“शिंदे-फडणवीसांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने…”, संजय राऊतांचा मोठा दावा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली.

Sanjay Raut Devendra Fadnavis Uddhav Thackeray
संजय राऊत, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. हे सरकार कोसळण्याच्या भितीनेच शिंदे-फडणवीसांनी अनेक घोषणांचा समावेश असणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच घोषणा केल्या, पण निधी कुठं आहे? असा सवालही केला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीसांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यांना माहिती आहे की, कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल. कारण ज्याप्रकारे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यावरून आम्हाला सर्वांना खात्री आहे की, घटनेनुसार निर्णय लागेल आणि सुरुवातीचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर सरकार कोसळेल, अशी परिस्थिती आहे.”

“हे सरकार कोसळल्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी अर्थसंकल्प”

“हे सरकार कोसळल्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्यात म्हणून काल थापेबाजीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात फक्त घोषणा आहेत. अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे, योजनांची घोषणा झाली आहे, पण सरकारच्या तिजोरीत पैसे कुठे आहेत,” असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

“शिंदे-फडणवीस आणि त्यांचे मायबाप निवडणुका लावायला तयार नाहीत”

संजय राऊत पुढे म्हणाले, “निवडणुका न घेणं हा ‘डरपोकपणा’ आहे. आम्ही रोज सांगत आहोत की, निवडणुका घ्या. विरोधी पक्ष कधीही निवडणुका घ्या सांगत नाही, पण आम्ही रोज सांगत आहोत. एकदा आमनेसामने होऊन जाऊद्या.”

हेही वाचा : विश्लेषण : रश्मी शुक्ला यांच्या नव्या नियुक्तीचा अर्थ काय? फोन टॅपिंगप्रकरणी आरोप असताना बढती कशी मिळाली?

“एवढं भेदरट राजकारण अनेक वर्षात पाहिलं नाही”

“शिवसेना कुणाची, महाराष्ट्र कुणाचा हा एकदाचा निर्णय होऊन जाऊद्या. मात्र, शिंदे-फडणवीस आणि त्यांचे केंद्रातील मायबाप निवडणुका लावायला तयार नाहीत. एवढं भेदरट राजकारण गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहिलं नाही. याला भित्रेपणाचं राजकारण म्हणतात,” अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 10:40 IST