मार्गासाठी ११ मेट्रो गाडय़ांची चाचणी सुरू

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) मार्गातील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व)  मार्गातील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याची घोषणा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. हा मुहूर्त गाठण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली नसून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवणे शिल्लक आहे. तर इतर ही अनेक तांत्रिक कामे बाकी आहेत. त्यामुळे आता या दोन्ही मार्गावरील पहिला टप्पा पुढच्या वर्षी, जानेवारी २०२२ मध्ये सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

एमएमआरडीए १८.५८९ किमीच्या ‘मेट्रो अ’ आणि १६.४७५ किमीच्या ‘मेट्रो ७’ मार्गाचे काम करीत आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तर दहिसर ते अंधेरी आणि दहिसर ते डी. एन. नगर अंतर कमी वेळात पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे असून हे मार्ग कधी सुरू होतील याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. हे दोन्ही मार्ग सेवेत दाखल झाल्यास २०१४ नंतर मुंबईकरांना दोन मार्ग उपलब्ध होणार आहेत. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रे ७’साठी देशी बनावटीच्या मेट्रो गाडय़ांची बेंगळूरु येथे बांधणी करण्यात येत असून या मार्गासाठी ११ मेट्रो गाडय़ा लागणार आहेत. यापैकी दोन मेट्रो गाडय़ा मुंबईत आल्या असून या गाडय़ांची चाचणी सुरू आहे.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या मार्गावर मेमध्ये पहिली चाचणी घेण्यात आली. या वेळी ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे टप्पा ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू होईल असे जाहीर करण्यात आले. हा मुहूर्त आता काही दिवसांवर आला असताना मोठय़ा प्रमाणावर काम शिल्लक आहे. त्यामुळे आता ऑक्टोबरचा मुहूर्त चुकणार असून जानेवारी २०२२ मध्ये पहिला टप्पा सुरू होईल, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप सर्व मेट्रो गाडय़ा आलेल्या नाहीत. सरकत्या जिन्याचे, मेट्रो स्थानकाचे काम बऱ्यापैकी शिल्लक आहे. तर मुख्य म्हणजे मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेले नाही. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असताना हे काम सुरू न झाल्याने ऑक्टोबरचा मुहूर्त चुकणार असे म्हटले जात आहे. तर जानेवारी २०२२ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी शक्य तितक्या लवकर काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कामाला वेग देण्यात आल्याचे सांगितले. मात्र ऑक्टोबरचा मुहूर्त गाठता येणार नाही का?  जानेवारी २०२२ नवीन मुहूर्त असेल का? याबाबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.