विचारांचे विरोधक विचारांनी लढत असतात, मात्र ज्यांच्याकडे विचारच नाहीत असे लोक मुद्दे सोडून गुद्दे आणि मारहाणीवर उतरतात. सनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन तर ती माझ्या कामाची पावती आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आजवर मी जो लढा दिला त्याला मिळालेले हे यश आहे असे मी मानतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  एवढेच नाही तर  माझ्या घराची रेकी करण्यात आली होती, मी याबाबत पोलिसांना कल्पनाही दिली होती असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यावेळी कदाचित पोलिसांना त्याचे गांभीर्य कळले नव्हते. पण मी पोलिसांना मी दोष देणार नाही. त्यांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केले आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

तालिबानी संघटनांपेक्षा हे मनुवादी विचारांचे लोक कमी नाहीत. महात्मा गांधींचीही हत्याच करण्यात आली होती पण महात्मा गांधींजींचे पुतळे उभारले गेले, त्यांचा विचार देशाने आणि जगाने स्वीकारला. नथुरामाचे पुतळे उभारण्यात आले नाहीत. माणूस मारता येतो त्याचे विचार मारता येत नाहीत असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या पण तुकाराम महाराजांचे विचार कसे संपवता येतील? अभंग रुपातून ते विचार आजही आपल्यात आहेत.

ज्या चार विचारवंतांना ठार करण्यात आले ते सगळे हिंदू होते हा विचारही यांनी करू नये?  सनातनी, मनुवादी हे पाकिस्तानात जाऊन हाफिज सईदला का संपवत नाहीत? त्यांच्या रक्तात या लोकांविषयी चीड का नाही? असेही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. एवढेच नाही तर ज्या पुरोगामी महाराष्ट्राने समाज सुधारणेचा विचार देशात रुजवला त्या देशात असे प्रकार घडतात हे दुर्दैव आहे असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली. ज्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया देत घराची रेकी झाली होती असेही म्हटले आहे.