मला तुंरूगातील अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते. माझ्या बराकीत सूर्यप्रकाशही पोहोचत नाही. मी चिकन मागितले तरी मला ते दिले जात नसल्याची कैफियत गँगस्टर अबू सालेमने पोर्तुगाल उच्चायुक्तांकडे मांडली आहे. मला तळोजा तुरूंगातील अधिकारी बळजबरीने शाकाहारी होण्यास सांगत आहे. आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार अबू सालेमने केल्यानंतर पोर्तुगाल उच्चायुक्ततील अधिकारी मंगळवारी चौकशीसाठी तुरूंगात आले होते. त्यावेळी सालेमने त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

अबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात शिक्षा भोगत आहे. पोर्तुगीज उच्चायुक्तांबरोबरील बैठकीला राज्याचे तुरूंग महानिरीक्षक उपस्थित होते. यावेळी त्यांच्याबरोबर कैद्यांवर उपचार करणारे डॉक्टरही आणि सालेमचा वकील उपस्थित होते. सालेमला तुरूंगात दिले जाणारे खाद्य चांगल्या दर्जाचे नसते. त्याला बळजबरीने शाकाहारी पदार्थ खाण्यास भाग पाडले जाते, अशी तक्रार सालेमचे वकील सबा कुरेशी यांनी केली.

सालेमच्या बराकीत पुरेसा सूर्यप्रकाशही येत नाही. त्याचे शौचालय छोटे आणि अत्यंत अस्वच्छ असते. त्यामुळे तो सातत्याने आजारी पडतो. त्याने आपल्या गुडघेदुखी आणि डोळ्याच्या तक्रारीबाबत येथील डॉक्टरांना सांगितले होते. त्या डॉक्टरांनी मुंबईतील तज्ज्ञाकडून उपचार करण्याचे सुचवले होते. सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेचे कारण देत गेल्या एक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबीयांना भेटूही दिले जात नसल्याचे सबा कुरेशींनी म्हटले.

तुरूंगाधिकारी सदानंद गायकवाड यांनी सालेमचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, आम्ही त्याला चिकन देऊ शकत नाही. जर डॉक्टरांनी अंडी देण्यास सुचवले तर आम्ही अंडी देतो. तो कँटीनमधून अंडी खरेदी करू शकतो. महत्वाचे म्हणजे अनेकजण याच परिस्थितीत येथे राहतात. येथे खुला परिसर आहे. त्यामुळे सर्वांनाच इथे दररोज ताजी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. तो प्रत्येकवेळी आपल्या आरोग्याबाबत तक्रार करतो. पण त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टर सांगतात, असेही त्यांनी स्पष्ट करत सालेमने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले.