अन्न आणि औषध प्रशासनाने वसई तालुक्यातील विरार जवळील एका विक्री केंद्रावरून भेसळीच्या संशयावरून हजारो किलो दूधाची भुकटी जप्त केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. म. देशमुख यांनी सोमवारी विरारजवळील टोकरे गावातील केरा डिस्ट्रीक्ट को.ऑपरेटिव्ह मिल्क प्रोडय़ुसर्स युनियन लिमिटेडच्या विक्री केंद्रावर धाड टाकून तेथील अमूल स्किम्ड पावडरचे नमुने घेतले. तसेच येथील एकूण ९ हजार ५४९ किलो दूध भूकटी अपेक्षित दर्जाची नसल्याने ताब्यात घेण्यात आली आहे. या दूध भुकटीची किंमत १८ लाख ९० हजार ७०२ रूपये असून विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या भुकटीचा नमुना तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून तेथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.