पुजारी टोळीच्या नावाने एका व्यापाऱ्याकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली आहे. हे तिघे कुख्यात गुन्हेगार असून दोघांना हत्येप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आली होती. शिवडी येथील एका व्यापाऱ्याला गेल्या काही दिवसांपासून खंडणीसाठी फोन येत होते. पुजारी टोळीचे नाव सांगून या व्यापाऱ्याकडून ते ५० लाखांची खंडणी मागत होते. अखेर त्या व्यापाऱ्याने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी सापळा लावून या तिघांना अटक केली. राकेश पावस्कर, गणेश गवळी आणि उस्मान शेख अशी या तिघांची नावे आहेत. गणेश आणि उस्मान या दोघांना हत्या प्रकरणात निर्मलनगर पोलिसांनी अटक केली होती. आर्थर रोड कारागृहात असताना त्यांची गणेश पावस्करची ओळख झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे