तीन दिवसांच्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची आणखी दुर्दशा

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतल्यामुळे निश्चिंत मनाने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची रस्त्यांवरील खड्डय़ांनी दैना केली. पावसाच्या सलग झोडपणीमुळे शहरातील बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झाली असून खड्डे टाळून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. समाजमाध्यमांवरूनही रस्त्यांच्या अवस्थेची छायाचित्रे प्रसारित होत असून स्थायी समितीच्या बैठकीतही सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

शहरात साधारण १९०० किलोमीटर लांबीचे रस्ते असून पालिकेने गेल्या दोन वर्षांत सुमारे सहाशे किलोमीटरचे रस्ते प्रकल्प तसेच प्राधान्य क्रमांक १ ते ३ या यादीत समाविष्ट करून त्यांचे काम केले आहे. प्रकल्प रस्त्यांमध्ये संपूर्ण रस्त्याचे बांधकाम केले जाते तर प्राधान्य यादीमधील रस्त्यांचा पृष्ठभाग खरवडून नव्याने केला जातो. मात्र पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचा मुद्दा काँग्रेसचे वांद्रे येथील नगरसेवक असिफ झकेरिया यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेता रवी राजा यांनीही त्यांच्या मुद्दय़ाला पाठिंबा देत वडाळा भागातच किमान ३०० खड्डे पडले असून संपूर्ण मुंबईत या हिशोबाने सहा ते सात हजार खड्डे पडले असतील, असा दावा केला. रस्त्याचे कामही निकृष्ट झाले असून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्याने खड्डे बुजवण्याचे काम वॉर्डवर पडल्याचे त्यांनी सांगितले. काम हाती घेतलेल्या रस्त्यांवरच खड्डय़ांचे जाळे पडल्याचा आक्षेप शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी घेतला. प्रतीक्षानगर येथील रस्त्याचे काम अडीच ते तीन वर्ष चालणार असून हा रस्ता पावसाच्या चार महिन्यांसाठी तयार करणे अपेक्षित होते. मात्र हा संपूर्ण रस्ता म्हणजे खड्डय़ांचे जाळे झाल्याचा आरोप सातमकर यांनी केला.

मेट्रोच्या कामांमुळे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अंधेरी, जोगेश्वरीमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत असून वाहनचालकांना अत्यंत त्रास होत असल्याचे सेनेच्या नगरसेविका राजुल पटेल म्हणाल्या. एच पूर्वमध्येही रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य असल्याचे सदानंद परब म्हणाले. अंधेरी- विलेपार्ले भागातही निकृष्ट कामांमुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे भाजपाचे नगरसेवक अभिजीत सामंत म्हणाले. रस्ते विभाग प्रमुखांना सहा महिने सांगूनही रस्त्याचे सर्वसाधारण काम होत नसून खड्डे हा त्याचाच परिणाम असल्याचा आरोप सपाचे गटनेता रईस शेख यांनी केला. घाटकोपर येथील प्रत्येक खड्डय़ावर आता पालिकेच्या  संबंधित अधिकाऱ्यांची छायाचित्र लावावीत, असा सल्ला राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.

अध्यक्षांकडून बचाव

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाचे संचालक विनोद चिठोरे अडचणीत सापडले होते. मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बचावात्मक पवित्रा घेत ‘पुढच्या वेळी लेखी उत्तर द्या’ असे सांगत चिठोरे यांची सुटका केली. यावर सपाचे गटनेता रईस शेख यांनी आक्षेप घेतला व प्रशासकीय अधिकारी उत्तर देण्यास तयार असताना लेखी उत्तर कशासाठी अशा प्रश्न उपस्थित केला. मात्र जाधव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.