मुंबई : दिग्गज आणि तरुण नाटककारांनी वेळोवेळी नाटकाच्या माध्यमातून स्त्रीच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. बदलत्या समाजरचनेबरोबर स्त्रीचे बदललेले स्थान, तिने घेतलेल्या भूमिका, नातेसंबंध असोत वा शिक्षण-नोकरीतील आव्हाने स्वीकारत झालेली तिची वाटचाल या सगळ्याचे प्रतिबिंब नाटकातून प्रभावीपणे उमटले. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर नाटकातील नायिकांच्या रुपाने उलगडत गेलेल्या स्त्रीत्वाच्या पैलूंचे वेध घेणारा ‘ती’ची भूमिका हा खास कार्यक्रम ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

रंगभूमीवरील महत्वपूर्ण स्त्री व्यक्तिरेखांमधून स्त्रीचे माणूस म्हणून अवलोकन करणारा ‘ती’ची भूमिका हा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी, ७ मे रोजी मुलूंड येथील कालिदास नाट्यगृहात रंगणार आहे. वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या नाटककारांच्या पाच प्रातिनिधिक नाट्यप्रवेशांमधून बदलत गेलेली ‘ती’ची भूमिका रंगमंचावर सादर होणार आहे. प्रस्थापित, दिग्गज पुरुष नाटककार पु. ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांनी मांडलेली स्त्री भूमिका ते तरुण स्त्री नाटककार अभिनेत्री रसिका जोशी, श्वेता पेंडसे यांच्या विचारातून उतरलेली स्त्री असा प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत कालिदास नाट्यगृहात उपलब्ध आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tichi bhumika special program has been organized on behalf of loksatta mumbai print news ssb
First published on: 05-05-2024 at 15:58 IST