महाराष्ट्रात जन्मजात व्यंग असलेल्या अर्भकांच्या संख्येची रीतसर स्वतंत्र नोंद झाली, तर या समस्येच्या वेगवेगळ्या कारणांपर्यंत पोहोचता येऊ शकेल आणि या समस्येचा निश्चित आवाकाही स्पष्ट होईल. हे लक्षात घेत राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालये व खासगी क्लिनिक्सना याबाबतची नोंद करणे सक्तीचे करावे, असा मतप्रवाह वैद्यक क्षेत्रात पुढे येत आहे. या समस्येतील कायदेशीर आणि भावनिक गुंतागुंत लक्षात घेता संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
या संदर्भात ठाण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर म्हणाले, ‘‘आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये २० आठवडय़ांनंतरच्या सोनोग्राफी चाचण्यांमध्ये पोटातल्या बाळाला गंभीर स्वरूपाचे जन्मजात व्यंग असल्याचे लक्षात येते, तेव्हा त्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यास आम्ही असमर्थ असतो. त्या बाळाचे जन्मानंतरचे जिणे खूपच क्लेशकारक असणार आहे, हे सुस्पष्ट असते. तरीही डॉक्टरांना याबाबतचा निर्णय घेता येत नाही. याचे कारण म्हणजे यासंबंधीचा २० आठवडय़ांपर्यंतच गर्भपात करण्यासंबंधीचा कायदा. माझ्या मते, गंभीर स्वरूपाचे व्यंग असलेल्या पोटातल्या बाळाला वाढवायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे त्या मातेला घेऊ देणे, हे सयुक्तिक ठरेल.  या समस्येवर उपाय शोधताना सोनोग्राफी आणि गर्भपातासंबंधीची माहिती राज्य सरकारला पाठवतानाच जन्मजात व्यंग असलेल्या अर्भकाची माहितीही पाठवणे प्रत्येक रुग्णालय वा क्लिनिकला बंधनकारक करावे, असे डॉ. बेडेकर यांनी सुचवले. या संबंधात सुमारे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही आपण पत्र पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यावर त्यांना अद्याप कुठलेही उत्तर मिळालेले नाही.
गर्भाच्या हृदयाची वाढ पूर्ण होण्यास २० आठवडय़ांचा कालावधी लागतो, तर किडनीची वाढ २२ व्या आठवडय़ात पूर्ण होते, असे या संदर्भात माहिती देताना बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘इंग्लंडच्या फेटल मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि सोनोग्राफीद्वारे गर्भातील जन्मजात व्यंगासंबंधीचे संशोधन करणारे तज्ज्ञ सायप्रस निकोलोडिस यांनी या संदर्भात जगभरात पाळले जावेत, अशी मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत.’’ जन्मजात व्याधीचे निदान व्हावे, यासाठी १८ ते २२ आठवडय़ांच्या कालावधीत विशेष सोनोग्राफी केली जावी आणि ही विशिष्ट सोनोग्राफी १८ ते २२ आठवडय़ांच्या कालावधीत कमीत कमी चार वेळा सविस्तर (सुमारे तासभर) करणे अत्यावश्यक आहे, तरच जन्मजात व्यंगाचे शंभर टक्के निदान होऊ शकते, असे या तज्ज्ञाने स्पष्ट केले आहे. अर्थात ‘अनॅमोली स्कॅन’ या विशेष सोनोग्राफी करण्यासाठीची अद्ययावत यंत्रणा मुळात आपल्याकडे सर्वत्र विकसित झाली आहे का, हेही पाहणे निकडीचे ठरते. उशिरा लग्न होणे, व्यंधत्वावर केले जाणारे उपाय आणि जीवनशैली यामुळे जन्मजात व्यंग असणाऱ्या बालकांची संख्या वाढत असल्याचे वैद्यक क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. जन्मजात व्यंग होऊ नयेत, यासाठी गर्भार स्त्रियांनी वेळेवर सोनोग्राफी करणे तसेच गर्भधारणेचा निर्णय घेतल्यापासून प्रसूतीपर्यंत फोलिक अ‍ॅसिड हे जीवनसत्त्व घेणे अत्यावश्यक ठरते, असेही डॉ. अन्नदाते यांनी या वेळी सांगितले.
गंभीर स्वरूपाचे व्यंग जर २० आठवडय़ांनंतरच्या चाचण्यांमध्ये दिसून आले, तर काय करायचे, यासंबंधीची ठोस मार्गदर्शक तत्त्वे डॉक्टरांकडे उपलब्ध नाहीत, याकडे औरंगाबाद येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती शिराडकर यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘‘गर्भात हृदय, मेंदू यासंबंधित व्यंग हेरू शकणाऱ्या चाचण्या या गर्भारपणाच्या उशिराच्या टप्प्यात- काही तर १८ ते २० आठवडे वा त्यानंतरच्या कालावधीत करता येतात. त्यामुळे अर्थातच यासंबंधित व्यंगेही उशिरा लक्षात येतात. मात्र आपल्याकडे कायद्याने गर्भपाताची मर्यादा २० आठवडे असल्याने त्यानंतर गर्भपात करता येत नाही व जन्मजात व्यंग असलेले बालक जन्माला येते. अशा प्रकारच्या प्रकरणांची संख्या गेल्या दोन-तीन वर्षांत वाढल्याचे निरीक्षणही त्यांनी नमूद केले. यावर उपाय म्हणजे गर्भपाताची मर्यादा केसनुसार लवचीक करता यावी आणि गर्भपात करण्यासंबंधीचा निर्णय रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, बालरोग शल्यविशारद आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांनी एकत्र येऊन घ्यावा.’’
मात्र या समस्येवर गर्भपाताची मर्यादा वाढवणे हा उपाय नाही, अशी स्पष्टोक्ती जे. जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख असलेल्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी केली. एखादा कायदा हा सारासार विचार करून बनवला जात असतो. गर्भपाताची मर्यादा वाढवली तर त्याचा गैरवापरच अधिक होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अद्ययावत तंत्रसुविधेमुळे अलीकडे गर्भातील बहुसंख्य दोष १८ आठवडय़ांपर्यंत लक्षात येतात खरे, मात्र समाजातील विस्तृत स्तराचा विचार करता स्त्रिया मुळात सोनोग्राफीलाच उशिरा येतात आणि त्यामुळे गंभीर प्रकारचे दोष असले तरी कायद्यानुसार २० आठवडय़ांनंतर गर्भपात करता येत नाही आणि जन्मजात व्यंग असलेली बालके जन्माला येतात. मात्र यावर उपाय हाच आहे की, सोनोग्राफीसंदर्भात गरोदर स्त्रियांमध्ये सजगता येणे आणि त्यांनी वेळेवर ही तपासणी करून घेणे, असे मत डॉ. डावर यांनी व्यक्त केले. चिपळूणच्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुवर्णा पाटील यांनी मुळात ग्रामीण भागात सोनोग्राफी करणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे आणि सोनोग्राफीसाठी आवश्यक ठरणाऱ्या यंत्रणेचीही वानवा आहे, याकडे लक्ष वेधले. (समाप्त)
* चेन्नईच्या फेटल केअर रिसर्च फाऊंडेशन या ट्रस्टतर्फे ‘बर्थ डिफेक्ट रजिस्ट्री ऑफ इंडिया’चे काम चालवले जाते. जन्मजात व्यंग असलेल्या बालकांच्या माहितीचे विश्लेषण या संस्थेतर्फे विनामोबदला केले जाते. या सुविधेचा लाभ घेण्याची इच्छाशक्ती जर राज्य सरकारने दाखवली, तर सरकारी तिजोरीतील एक छदामही खर्च न करता महाराष्ट्रातील जन्मजात व्यंग असलेल्या बालकांच्या स्थितीबाबतचा अहवाल सरकारकडे उपलब्ध होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने समस्येच्या मुळापाशी जाता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To control bybirth sarcasm baby need birth of political volition
First published on: 20-01-2013 at 04:45 IST