लैंगिक शोषणप्रकरणी २९ आरोपी अटकेत

कल्याण : डोंबिवली येथील लैंगिक शोषण प्रकरणात आतापर्यंत २८ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडितेला अंमली पदार्थांचे सेवन करण्यास लावून आरोपी तिच्यावर अत्याचार करीत असत, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 

या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी दिली. दोन अल्पवयीन आरोपींना बाल-हक्क न्यायालयापुढे हजर करून, त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात ३३ आरोपी असल्याचे गुुरुवारी सांगितले होते. याविषयी तपास अधिकारी ढोले म्हणाल्या की प्राथमिक माहिती अहवालाप्रमाणे २९ आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीतून पुढे येणाऱ्या माहितीमधून आरोपींची संख्या वाढू शकते. आतापर्यंत ३३ पैकी २८ आरोपींना अटक करण्यात आल्याचेही ढोले यांनी स्पष्ट केले

विजय फुके या आरोपीचे पीडित मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याने तिची अश्लिल चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीच्या आधारे तो तिला धमकावत होता. फुके यानेच पीडितेशी अन्य आरोपींची ओळख करून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मुलगी गुंगीत असताना दुष्कृत्य

पीडितेचा मित्र विजय फुके आणि त्याचे ३३ आरोपी मित्र जानेवारीपासून पीडितेचे लैंगिक शोषण करीत होते.  एकावेळी सहा आरोपी पीडितेला मुरबाड, बदलापूर, कोळे, रबाळे या भागांतील शेतघरे किंवा अन्य ठिकाणी घेऊन जात होते. तेथे तिला थंड पेयातून अंमली पदार्थ सेवन करण्यास देत आणि तिला गुंगी आली की ते तिच्यावर अत्याचार करीत होते, असे तपासातून निष्पन्न झाले आहे. आरोपी अंमली पदार्थ कोठून मिळवायचे, याचाही तपास पोलीस करीत आहेत.