आनंदवन, विज्ञान आश्रम, स्नेहालय आदी संस्थांकडे ओढा
निसर्ग व तीर्थक्षेत्रांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणजे सामाजिक क्षेत्रातले पुढारलेपण. यामुळे वध्र्यातील ‘आनंदवना’पासून ते पाबळच्या ‘विज्ञान शाळे’पर्यंतचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले. आता या प्रयोगांमुळे ‘सामाजिक पर्यटना’ची एक नवीनच संकल्पना येथे मूळ धरू लागली आहे. सध्या तर दरवर्षी सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणांना किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या पर्यटकांचे पायही या ‘समाजक्षेत्रां’कडे वळू लागली आहेत.
आतापर्यंत ‘आनंदवन’, ‘हेमलकसा’ला भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. मात्र आता अहमदनगरमधील ‘राळेगणसिद्धी’ व ‘हिवरेबाजार’, ‘स्नेहालय’, गडचिरोलीतील ‘शोधग्राम’, मेळघाटमधील ‘संपूर्ण बांबू प्रकल्प’, पुण्यातील ‘विज्ञान आश्रम’, ‘सावली’ या स्थळांना भेटी देणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असल्याचे ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळा’अंतर्गत ‘अमृतयात्रा’द्वारे २००९ पासून ‘सामाजिक सहली’ आयोजित करणारे अनिल काळे यांनी सांगितले.
या सफरीतून पर्यटकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पर्यटक मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेल्या लोकांविषयी अधिक संवेदनशील होतात. अनेकांना आयुष्य समृद्ध करणारा अनुभव मिळतो, असे ‘स्वच्छंद यात्रा’चे गिरीश सावंत यांनी सांगितले.
पर्यटकांच्या भेटींमुळे आमचे काम सर्वदूर पोहोचते. तसेच, संस्थेला आर्थिकबरोबरच मानसिक पाठबळही मिळते, अशा शब्दांत पाबळमध्ये १९८३ साली सुरु झालेल्या ‘विज्ञान शाळेचे’ विशाल जगताप यांनी सामाजिक पर्यटनाचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारागिरांना बाजारपेठ
सुरुवातीला मेळघाट म्हणजे कुपोषण असा समज होता. आता गेल्या काही वर्षांत मेळघाटाचे बदलले रूप पाहण्यासाठी पर्यटक येतात, असे इथल्या ‘संपूर्ण बांबू केंद्रा’चे सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांचा हेतू फिरण्यापेक्षा इतले काम जाणून घेण्यात, ज्ञान मिळविण्यात असतो. तसेच इथल्या स्वावलंबनाचे संस्कार नकळत पर्यटकांवरही होतात, हेही त्यांनी नमूद केले.
आता गर्दी आवरणे कठीण
१९९७ पर्यंत आनंदवनात कोणी पाहुणा आला तर त्याचे कौतुक वाटायचे. मात्र वर्षभराची नोंदणी आधीच झालेली असते. पुण्यातील स्वप्निल कुंबूजकर या तरुणाने पहिल्यांदा आनंदवनात सहल आणली. साधारण २००३ नंतर आनंदवनात भेटी देणाऱ्यांची संख्या वाढली. आता पर्यटकांची गर्दी आवरणे कठीण झाले आहे.
– कौस्तुभ आमटे, महारोगी सेवा समिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists prefer social tourism
First published on: 08-02-2016 at 00:03 IST