पनवेलहून वडाळ्याला जाणारी लोकल गाडी नेरूळ स्थानकात बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास बंद पडलेली ही गाडी साडेआठ वाजेपर्यंत सुरू न झाल्याने अखेर ही लोकल सानपाडा कारशेडमध्ये हलवण्यात आली.
पनवेलहून वडाळ्याला जाणारी लोकल सकाळी ७.५० वाजता नेरूळ रेल्वे स्थानकात बंद पडली. या गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. मात्र गाडी सकाळी साडेआठ पर्यंत नेरूळ रेल्वे स्थानकातच उभी होती. अखेर ही गाडी सानपाडा कारशेडमध्ये पाठवण्यात आली. मात्र ही गाडी एकाच जागी तब्बल एक तास उभी असल्याने त्याचा परिणाम इतर गाडय़ांच्या फेऱ्यांवरही झाला.
परिणामी कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. मात्र एकही फेरी रद्द न झाल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.