महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका उल्हासनगर येथील दोन युवा गणेश भक्तांना बसला असून विजेच्या तारांचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हितेश सचदेव व हितेश तलरेजा असे दुर्दैवी युवकांचे नाव असून दोघेही गणेशोत्सव मिरवणुकीत गणेश मुर्तीजवळ उभे होते. यामध्ये आणखी एकजण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
उल्हासनगर येथील सेक्शन १७ मध्ये जय मातादी मित्र मंडळाचे कार्यकर्ते गणेश मुर्ती घेऊन निघाले हेाते. येथील टर्निंग पॉईंट चौकात मुर्तीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्याचवेळी मुर्ती सांभाळण्यासाठी उभे असलेले हितेश सचदेव व हितेश तलरेजा यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूला उभ्या असलेला सुनील रोहरा हे जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.