हकनाक बळी!

दोन गटांच्या भांडणात एका गटाने दुसऱ्यावर हल्ला केला. दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर गप्पा मारणारे दोन तरुण त्यामुळे घाबरले.

दोन गटांच्या भांडणात एका गटाने दुसऱ्यावर हल्ला केला. दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर गप्पा मारणारे दोन तरुण त्यामुळे घाबरले. वास्तविक त्यांचा या भांडणाशी काहीच संबंध नव्हता. मात्र चॉपर आणि तलवारी घेऊन येणारा गट पाहून हे दोघे घाबरून पळत सुटले. पळताना वाटेत आलेल्या नाल्यात त्यांनी उडी मारली. परंतु नाल्यातील गाळात ते अडकले आणि हकनाक प्राणाला मुकले. वडाळ्यातील जय महाराष्ट्र नगरमध्ये गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. राहुल गवळी (१८) आणि दुर्गेश चौरसिया (१८) अशी या तरुणांची नावे आहेत. राहुल व दुर्गेश रात्री दहाच्या सुमारास ते याच परिसरातील पन्ना यादव आणि सुनील उर्फ हड्डी यांच्याशी गप्पा मारत उभे होते. त्यावेळी तरुणांचा एक गट यादववर हल्ला करण्यासाठी आला. त्यामुळे घाबरून हे तिघेही पळत सुटले. पळत असताना वाटेत एक नाला आला. यादवने प्रथम नाल्यात उडी मारली. पाठोपाठ दुर्गेश आणि राहुलनेही उडी मारली. पण या दोघांना चिखलात रुतल्याने मृत्यू झाला. वडाळा टीटी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अग्निशमन दलाच्या मदतीने या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या दोघांचा भांडणाशी काहीच संबंध नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी पन्ना यादव, विजय परूळकर व सूर्या या तिघांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two young men killed after stuck in sewer mud