मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने आयोजित केलेली बैठक उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्याचे वृत्त आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्रीच जर स्वतः म्हणत असतील की फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नाही तर आम्ही या बैठकीत कशावर चर्चा करायची. कशासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठकच रद्द केली आहे.”

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जर फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नव्हती असे ते म्हणत असतील तर मला वाटतं आपण सत्याची व्याख्याच बदलायला हवी. कारण, मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे, माध्यमांचे प्रतिनिधीही त्याठिकाणी उपस्थित होते.

मुख्यमंत्री स्वतः फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. उद्धव ठाकरेंनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शाहांच्या समोर हे बोलणं झालं आहे. जर आता ते म्हणत असतील की अशी कोणती चर्चाच झाली नव्हती तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी म्हटले आहे.