मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नवे चिन्ह ‘मशाल’च्या प्रचारगीतामध्ये असलेले ‘हिंदूू’ आणि ‘भवानी’ हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. हे शब्द हटविणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र आयोगाच्या नोटिशीमुळे हिंदूत्वाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेण्यास ठाकरे यांना आयती संधी मिळाली आहे.

हेही वाचा >>> निवडणुकीत ठाकरे गटाच्या हाती नव्याने हिंदूत्वाचा मुद्दा

ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी ‘मशाल’ चिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर आधारित प्रचारगीत शिवसेनेने प्रसिद्ध केले. त्यात ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म’ अशी ओळ आहे. निवडणूक आयोगाने ‘हिंदू’ शब्द काढण्यास सांगितला आहे. याच गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषातील भवानी शब्दावरही निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे. त्यावर ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जोरदार तोफ डागली. मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय बजरंग बली बोला आणि बटण दाबा’ असे सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा यांनीही मध्य प्रदेशमध्ये आयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन हवे असेल तर भाजपला निवडून दया’ असे वक्तव्य जाहीर सभेत केले होते. आम्ही हिंदूंच्या नावाने मते मागितलेली नसतानाही भाजपचा नोकर असल्याप्रमाणे वर्तवणूक असलेल्या निवडणूक आयोगाने शब्द काढायला सांगणे, हा अन्याय आहे असे ठाकरे म्हणाले. आमच्यावर कारवाई करण्याअगोदर मोदी व शहा यांच्यावर आयोगाला कारवाई करावी लागेल, असे ठाकरे यांनी ठणकावले.

साधे उत्तरही दिले नाही

मोदी यांच्याकडून बजरंगबलीची घोषणा आणि शहा यांच्याकडून रामलल्लाच्या दर्शनाचे आमिष दाखविल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. देवदेवतांच्या नावे मत मागण्याची मुभा पंतप्रधान व गृहमंत्र्यांना देण्यात आली आहे का? तसे असल्यास आम्हीही देवदेवतांच्या नावे मत मागू, असे या पत्रात म्हटले होते. मात्र निवडणूक आयोगाने या पत्राला साधे उत्तरही दिले नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

भवानी माता महाराष्ट्राची कुलदेवता आहे. तिचा अपमान सहन केला जाणार नाही. हा शब्द आम्ही ठेवणार आणि बोलणार. आयोग उद्या ‘शिवाजी’ शब्दावरही आक्षेप घेईल. ही हुकूमशाही स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)