स्वच्छता मोहिमेतून जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. भाजप नेत्यांनी मुंबईत स्वच्छता मोहीम राबविली, मात्र तिच्यावर निवडणूक आचारसंहितेचे सावट होते. निवडणूक आयोगाचे निरीक्षक व छायाचित्रकार यांनी सर्व ठिकाणी चित्रीकरण केले आहे. त्याची पडताळणी करुन कोठे आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळल्यास योग्य ती पावले निवडणूक अधिकाऱ्यांकडून उचलली जातील, असे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले. खार रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या कार्यक्रमास अमित शहा, खासदार पूनम महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. आचारसंहितेच्या बडग्यामध्ये न सापडण्यासाठी भाजपने सामाजिक पध्दतीने कार्यक्रम पार पाडण्याचे नियोजन केले व राजकीय भाषणबाजी टाळली. पक्षाचे झेंडे, पोस्टर, बॅनर्स नव्हते. मात्र आशिष शेलार यांच्या शर्टावर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ लावलेले होते. खासदार पूनम महाजन यांच्याप्रमाणेच किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराने मुलुंड, घाटकोपर येथे, तर गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने बोरिवलीतही ही मोहीम पार पडली.