एशियाटिक सोसायटीचा दरबार हॉल ‘त्या’ कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच भरून गेला होता. एवढेच नव्हे तर हॉलच्या बाहेरही मोठा पडदा लावून आत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण त्यावर करण्याची सोय करण्यात आली होती. निमित्त होते ते मराठी साहित्यातील ‘ज्ञानतपस्विनी’ दुर्गाबाई भागवत यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाचे.
एशियाटिक सोसायटीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास दुर्गाबाई यांच्या चाहत्यांनी आणि रसिक साहित्यप्रेमींनी मोठय़ा प्रमाणावर आपली हजेरी लावली होती. एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये लावण्यात आलेल्या आणि ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी साकारलेल्या दुर्गाबाई यांच्या तैलचित्राचे अनावरण माजी न्यायमूर्ती आणि लोकायुक्त विजय टिपणीस यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दुर्गाबाई यांच्या आठवणींना विविध वक्त्यांनी उजाळा दिला. डॉ. वैशंपायन यांनी सांगितले की, मानवी जीवनाविषयीचे आकलन त्यांच्या लेखनातून सातत्याने दिसून आले आहे. त्यांच्या लेखनात गर्भरेशमी वस्त्रासारखा पोत होता. तर बहुलकर यांनी दुर्गाबाई यांचे तैलचित्र आपल्याला साकारायला मिळाले आणि ते एशियाटिक सोसायटी सारख्या वास्तूत लावण्यात आले हा माझ्यासाठी भाग्ययोग असल्याच्या भावना व्यक्त केल्या. डॉ. हेरूर म्हणाल्या की, अन्य लोकांसाठी त्या दुर्गाबाई असल्या तरी आम्हा घरच्यांसाठी ती ‘दुर्गुताई’ होती. निर्भिड व स्पष्टवक्ती असलेल्या दुर्गुताईने सत्याची कास कधीही सोडली नाही. डॉ. सरदेशपांडे यांनी दुर्गाबाई संशोधन करणाऱ्या प्रत्येकालाच कशी मदत करायच्या, त्याच्या आठवणी सांगितल्या. तर अशोक शहाणे यांनी दुर्गाबाई यांना आणिबाणीच्या काळात एशियाटिक सोसायटीच्या वास्तूत अटक झाली तेव्हाच्या आठवणीला उजाळा दिला.अंबरनाथ येथील शिवमंदिरावर डॉ. कुमुद कानिटकर यांनी लिहिलेल्या संशोधनात्मक ग्रंथास फ्रेंच अकादमीचा ‘हिरायामा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल या कार्यक्रमात डॉ. कानिटकर यांचा टिपणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी स्वत: बहुलकर, एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर, ज्येष्ठ समीक्षक अशोक शहाणे, डॉ. मंगला सरदेशपांडे, दुर्गाबाई यांच्या भाची डॉ. उमा हेरुर, दुर्गाबाई यांच्या साहित्याच्या अभ्यासिका डॉ. मीना वैशंपायन आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2013 रोजी प्रकाशित
दुर्गाबाईंच्या तैलचित्राचे अनावरण
एशियाटिक सोसायटीचा दरबार हॉल ‘त्या’ कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच भरून गेला होता. एवढेच नव्हे तर हॉलच्या बाहेरही मोठा पडदा लावून आत
First published on: 03-08-2013 at 08:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unveiling of portrait of durgabai