येत्या १ मेपासून देशभरातील १८ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंध लस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र १८ वर्षांवरील मुंबईकरांचे लसीकरण केंद्राकडून मिळणाऱ्या लससाठ्यावर अवलंबून आहे. एकीकडे पालिका लसीकरणाची जय्यत तयारी करीत आहे, तर दुसरीकडे पालिकेला लससाठ्याची प्रतीक्षा आहे.

मुंबईमधील १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची तयारी पालिकेने सुरू केली आहे. भविष्यात सरकारी केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे खासगी लसीकरण केंद्रातच लसीकरण करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईत २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. मात्र १८ वर्षांवरील मुंबईकरांचे लसीकरण केंद्र सरकारकडून ३० एप्रिल रोजी उपलब्ध होणाऱ्या लससाठ्यावर अवलंबून आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध झाला, तरच १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून सुरू करता येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

दरम्यान, १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने तयारी सुरू केली आहे. भविष्यात लसीकरण मोहीम योग्यरित्या पार पडावी यासाठी नियोजन सुरू असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.