४५ वर्षांवरील दुसऱ्या मात्रेचे ६१ टक्के नागरिक प्रतीक्षेत

मुंबई : गेले दोन दिवस बंद असलेले लसीकरण अखेर शुक्रवारी सुरू झाल्यामुळे अनेक केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. परंतु प्रत्येक केंद्रावर मोजक्याच मात्रा मिळाल्यामुळे अनेकांना लस न घेताच परतावे लागले.

लशींचा खडखडाट झाला तरी लशींचा साठा प्राप्त न होणे, दुसऱ्या दिवशी आल्यामुळे लसीकरण विलंबाने सुरू होणे, दोन दिवस लसीकरण बंद राहिल्यावर तिसऱ्या दिवशी केंद्रावर गर्दी होणे हे चित्र गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. गेल्या शुक्रवारी पालिकेला ४५ हजार मात्रा प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी पावसाचा जोर अधिक असल्यामुळे लसीकरण तुलनेने कमी झाले. सोमवारी सुमारे ४० हजार नागरिकांचे लसीकरण केल्यानंतर थोडय़ाच मात्रा उरल्यामुळे केवळ ५२ केंद्रांवरच मंगळवारी लसीकरण सुरू ठेवले होते. त्यामुळे मंगळवारी सुमारे १४ हजार जणांना लस दिली गेली. परंतु त्यानंतर लस उपलब्ध न झाल्यामुळे बुधवारी लसीकरण बंद ठेवले गेले. गुरुवारीदेखील उशिरा लस साठा मिळाल्यामुळे लसीकरण सुरू करता आले नाही. त्यामुळे अखेर दोन दिवसानंतर शुक्रवारी लसीकरण पुन्हा सुरू झाले. गेल्या वीस दिवसांत तिसऱ्यांदा लसीकरण बंद राहिले आहे.

‘आता दुसरी मात्रा घेणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे यांची गर्दी जास्त आहे. त्यात शुक्रवारी केवळ ४०० मात्रा दिल्या गेल्या. यातील ५० टक्के ऑनलाइन नोंदणीने तर ५० टक्के पूर्वनोंदणीशिवाय आलेल्यांसाठी ठेवाव्या लागल्या. त्यामुळे शुक्रवारी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावलेल्या असल्या तरी २०० जणांनाच आत घेता आले. अन्य नागरिकांना माघारी पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता’, असे वांद्रे-कु र्ला संकु लातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘कूपरमध्येही सकाळपासून रांगा लागलेल्या होत्या. त्यात येथे परदेशात जाणाऱ्यांपासून गर्भवती, स्तनदा, अपंग अशा सर्वच वर्गवारीतील व्यक्तींचे लसीकरण असल्यामुळे अधिक गर्दी होते. परंतु त्या तुलनेत शुक्रवारी ५०० मात्रा मिळाल्यामुळे रांगा लावूनही अनेकांना लस न घेताच जावे लागले’, असे केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले. पावसातही लोक रांगेत लस उपलब्ध नसल्यामुळे आता ४५ वर्षांवरील दुसऱ्या मात्रेच्या लाभार्थ्यांना अनेकदा ताटकळत राहावे लागत आहे. पाऊस असूनही नागरिक पहाटे पाच वाजल्यापासूनच रांगेत उभे राहतात. परंतु कमी मात्रा असल्यामुळे आमचाही नाईलाज असतो, असे मुलुंडच्या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

५० हजार मात्राच

गुरुवारी पालिकेला सुमारे ५० हजार मात्राच मिळाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी पुरेशी लस असण्याची शक्यता कमी आहे. शुक्रवारी पुढचा साठा मिळणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. हा साठा आला तरच शनिवारी पूर्णपणे लसीकरण सुरू ठेवता येणार आहे.

लशींच्या तुटवडय़ामुळे नागरिक दुसऱ्या मात्रेसाठी ताटकळत

मुंबईत ४५ वर्षांवरील १३ लाख ९१ हजार नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. परंतु यातील सुमारे ३९ टक्के नागरिकांनी म्हणजे सुमारे ५ लाख ९६ हजार जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे. परंतु जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून लशींचा तुटवडा असल्यामुळे सुमारे ६१ टक्के नागरिक दुसऱ्या मात्रेसाठी ताटकळत आहेत.