खाद्यपदार्थाचे भाव अवाच्या सवा

भारतात परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी आयोजित केलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमामुळे परदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भारतासाठी खुल्या होतील तेव्हा होवोत, मात्र येथे असलेल्या खाद्यपदार्थाच्या दालनाला भेट दिल्यानंतर मुंबईकरांचा खिसा मात्र तातडीने रिकामा होत आहे. या दालनातील काही स्टॉल्सवर ‘मुंबईचा वडापाव’ या नावाखाली मिळणारा पदार्थ ८० रुपयांना मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्वच स्टॉल्सवरील खाद्यपदार्थाचे भाव प्रचंड चढे आहेत. त्यामुळे इतर २६ दालने पालथी घालून दमले भागले मुंबईकर या दालनात शिरतात खरे, पण एकाही पदार्थाची चव न घेता बाहेर पडतात.

‘मेक इन इंडिया’ हे प्रदर्शन मुख्यत्वे उद्योजकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी असले, तरी सर्वसामान्य मुंबईकरही कुतूहलापोटी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा रस्ता धरत आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून लाखो मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. रांगेत उभे राहून, आयत्या वेळी नोंदणी करून हे लोक विविध दालने पालथी घालतात. देशभरातील विविध भागांतून जमलेल्या कलाकारांची कलाही दाद देऊन पाहतात. मात्र ही २७ दालने पाहण्यासाठी किमान दोन तास भटकंती केल्यावर यापैकी एका दालनात खानपानाचीही सोय केली आहे.

त्याशिवाय सब वेची बाहेर १२५-१५० रुपयांना मिळणारी सॅण्डविचेस इथे २०० रुपयांना, डॉमिनोजचे पिझ्झा सरसकट १५०-२०० रुपयांना मिळत आहेत. त्यामुळे इथे भूक भागवणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठरत आहे.

  • २३ क्रमांकाच्या दालनात ही सोय असली, तरी त्यात मुख्यत्त्वे मॉलमध्ये दिसणारे खाद्यपदार्थाचेच ब्रॅण्ड प्रामुख्याने पाहायला मिळतात.
  • ‘मॅड ओव्हर डॉनट्स’, ‘डंकन डॉनट्स’, ‘सब वे’, ‘डॉमिनोज’ यांचा समावेश आहे. त्यात ‘राजधानी’, ‘लखनौ टुंडे कबाब’ आदी काही देशी ब्रॅण्ड्सही आहेत.
  • हे ब्रॅण्ड्स सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यात ‘राजधानी’च्या स्टॉलवर मिळणाऱ्या वडापावसाठी ८० रुपये मोजावे लागत आहेत.