ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक राम गोविंद मुंगी (वय ७३) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डोंबिवलीतील घरी निधन झाले. शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ नाटकाचे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुंगी हे काही महिन्यापासून आजारी होते. गुरुदत्त मित्र मंडळातर्फे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माणूस नावाचे बेट’, ‘सहलीला सावली आली’, ‘खून, खून, खून’ या नाटकांना राज्य नाटय़ स्पर्धेत बक्षिसे मिळाली. ‘अध्र्याच्या शोधात दोन’ हे राज्य नाटय़ स्पर्धेत गाजलेले नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. ‘बायको उडाली भुर्र’ हे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी आणले.
श्रीराम लागू अभिनित ‘आकाश पेलताना’ या नाटकाचे दिग्दर्शन राम मुंगी यांचे होते. त्यानंतर ‘मृत्युंजय’ची संधी त्यांना मिळाली. प्रत्येक संहितेवर कसून काम करणारा दिग्दर्शक अशी त्यांची ख्याती होती.   त्यांची अन्त्ययात्रा शनिवारी सकाळी ७ वाजता राहत्या घरापासून (ब्राह्मणसभेजवळ) निघणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran marathi play director ram mungi passes away
First published on: 20-07-2013 at 04:02 IST