घोड्यांच्या टापांची तालबद्ध टपटप आणि चाकांच्या चक्राची लय सांभाळून एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर डौलात घोडागाडी धावायची. पण यासाठी घोड्यांचा केला जाणारा वापर यामुळे प्राण्यांचे शोषण होत असल्याची प्राणी प्रेमींची धारणा होती. म्हणूनच मुंबईत घोडागाडीला बंदी घालण्यात आली. तेव्हा बंदी घालण्यात आलेल्या या घोडागाड्या आता पुन्हा थोड्या वेगळ्या रुपात सुरू होत आहेत. एक वेगळी ओळख असलेली घोडा गाडी नव्या स्वरुपात धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

उबो राइडस आणि खाकी टूर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिक्टोरिया सुरु करण्यात आली असून या गाड्यांची रचना जुन्या व्हिक्टोरियाप्रमाणेच आहे. सध्या १२ गाड्या कार्यरत झाल्या असून आणखी काही गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट परिसरात पर्यटकांसाठीही या गाड्या लवकरच सुरू होणार आहेत.