भारतातील विपश्यनेच्या आधुनिक अवताराचे प्रणेते गुरू सत्यनारायण गोएंका यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी इलायचीदेवी आणि सहा मुले असा परिवार आहे.
गोएंका यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर मंगळवारी जोगेश्वरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ३० जानेवारी १९२४ रोजी ब्रह्मदेशात (सध्याचे म्यानमार) जन्मलेले गोएंका वयाच्या पस्तिशीपर्यंत तेथेच राहिले. म्यानमारमधील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या गोएंका यांनी उ. बा. खिन यांच्याकडून विपश्यनेचे धडे घेतले. यानंतर त्यांनी आपले पुढचे आयुष्य विपश्यनेच्या प्रचारासाठी वाहिले.
त्यांनी १९६९ साली भारतात विपश्यनेचे वर्ग सुरू केले. विपश्यनेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक अनुभवातून मानवाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. या दरम्यान इगतपुरी येथे विपश्यना प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. गोएंका यांनी ३००हून अधिक अभ्यासक्रम तयार केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ८००हून अधिक प्रशिक्षक तयार झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, ब्रिटन, जपान, श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश आणि नेपाळ या देशांमध्ये विपश्यना प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.